रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पोहोचला 352 दिवसांवर; नवी मुंबईकरांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 11:29 PM2020-11-11T23:29:20+5:302020-11-11T23:31:23+5:30
चार विभागांतील मृत्युदर दोन टक्क्यांपेक्षा कमी
नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला यश येऊ लागले आहे. नवी मुंबईमध्ये फक्त २.७३ टक्के रुग्ण शिल्लक आहेत. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३५२ दिवसांवर पोहोचला असून तब्बल चार विभागांतील मृत्युदर दोन टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे.
दिवाळीमध्ये योग्य काळजी घेतली तर लवकरच कोरोनामुक्त नवी मुंबई करणे शक्य होणार आहे. राज्यातील कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या शहरांमध्ये नवी मुंबईचाही समावेश झाला होता. शहरातील मृत्युदर साडेतीन टक्क्यांवर पोहोचला होता. हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध होत नव्हती. चाचण्यांचा अहवाल १० ते १५ दिवस मिळत नव्व्हता. . आयसीयू, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन बेडची कमतरता निर्माण झाली हाेती. एपीएमसीमधील अनेक प्रथितयश व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला होता.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने ब्रेक द चेन मोहिमेसह शून्य मृत्युदराचे उद्दिष्ट निश्चित करून उपाययोजना करण्यास सुरुवात केली. स्वत:ची स्वतंत्र आरटीपीसीआर लॅब तयार केली. ॲन्टिजन चाचण्यांची संख्या वाढविली. कोरोना रुग्ण आढळून आला की त्याच्या संपर्कातील किमान २० जणांशी संपर्क साधून त्यांची चाचणी करण्यास सुरुवात केली. या सर्व उपाययोजनांमुळे शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली आहे.
नवी मुंबईमध्ये तब्बल ९५.२४ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मृत्युदर २.०३ झाला आहे. बेलापूरमध्ये १.८९, नेरूळमध्ये १.६७, वाशीमध्ये १.७७ व घणसोलीमध्ये १.८७ टक्के मृत्युदर झाला आहे. शिल्लक रुग्णांची संख्या १२०१ एवढी झाली आहे. प्रत्येक विभागातील रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. दिघामध्ये सर्वांत कमी ३२ व नेरूळमध्ये सर्वांत जास्त २४७ रुग्ण शिल्लक आहेत.