अमृत महोत्सवी वर्षात कोकणात फुलविली २७ हेक्टरवर वनराई; वन विभागाचे अभियान
By कमलाकर कांबळे | Published: December 27, 2023 09:00 PM2023-12-27T21:00:11+5:302023-12-27T21:00:30+5:30
एक लाख ३४ हजार ४९० झाडांची लागवड
कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वन विभागाने कोकण विभागातील २७.४५ हेक्टर जागेवर वनराई फुलविली आहे. याअंतर्गत २०२३-२४ या वर्षात एक लाख ३४ हजार ४९० झाडांची लागवड करण्यात आल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.
वृक्षसंवर्धन आणि वृक्ष लागवडीसाठी शासनामार्फत बेलवन, अमृतवन, पंचायतवन आणि मियावाकी वननिर्मितीचे काम हाती घेतले होते. अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना वन विभागामार्फत धार्मिक स्थळांच्या ठिकाणी ‘बेलवन’ उद्यानांची निर्मिती केली आहे. बेल वृक्षाची पाने, मुळे, फळे व सालीचा उपयोग व्हावा, हा यामागचा उद्देश होता. या बेलवनातून धार्मिक स्थळांच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना उपयुक्त असणाऱ्या औषधी वनस्पती अर्थात बेल, सीता अशोक, रुद्राक्ष, बोर, पळस, पारिजात, पांढरा चाफा, पांढरी कण्हेर या वृक्षांचा उपयोग होणार आहे.
अमृतवन, पंचायत वनाची निर्मिती
कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण २.६० हेक्टर क्षेत्रावर एकूण एक हजार ४० बेल व इतर वृक्षांची लागवड केली आहे. कोकण विभागातील ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील एकूण ३ हेक्टर क्षेत्रावर एकूण एक हजार २०० वृक्षांची लागवड करून अमृत वन तयार केले आहे. तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण १७.५० क्षेत्रावर एकूण एक हजार ७५० वृक्षांची लागवड करून पंचायत वन तयार करण्यात आल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.