अर्धवट खोदकामांमुळे कोपरखैरणेत धूळ; रहदारीला अडथळा, तक्रारीनंतरही दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 01:00 AM2021-01-25T01:00:52+5:302021-01-25T01:01:10+5:30
कोपरखैरणे सेक्टर १८ व लगतच्या परिसरात विविध कामानिमित्ताने रस्ते खोदण्यात आले आहेत;
नवी मुंबई : कोपरखैरणे परिसरात जागोजागी रस्त्यांचे खोदकाम करून ते अर्धवट ठेवल्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. अर्धवट कामांमुळे परिसरात धूळ पसरत असून, रहदारीला देखील अडथळा होत आहे. परंतु याबाबत सातत्याने तक्रार करूनदेखील खोदकामे बुजवली जात नसल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
कोपरखैरणे सेक्टर १८ व लगतच्या परिसरात विविध कामानिमित्ताने रस्ते खोदण्यात आले आहेत; परंतु काम झाल्यानंतर खोदलेले रस्ते पूर्णपणे बुजवून डांबरीकरण न करताच अर्धवट स्थितीत ठेवण्यात आले आहेत. मुळातच कोपरखैरणे कॉलनीअंतर्गतचे रस्ते अरुंद असून, रस्त्यांना लागूनच रहिवासी घरे आहेत. अशा परिस्थितीत अर्धवट ठेवलेल्या खोदकामांमुळे तिथली धूळ उडून लगतचा घरांमध्ये जात आहे. याचा त्रास नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, परिसरातले प्रदूषणदेखील वाढत आहे. शिवाय खोदकामातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात वाहतुकीला देखील अडथळा होत आहे. शिवाय खोदकामामुळे जागोजागी झालेल्या खड्ड्यात सांडपाणी साचून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे मागील दोन ते तीन महिन्यांपासून अर्धवट अवस्थेतील खोदकाम बुजविण्याची मागणी रहिवासी देव मोरे यांनी केली आहे.
नागरिकांची होत आहे गैरसोय
यासंदर्भात त्यांनी ठिकठिकाणी तक्रारीदेखील केल्या आहेत; परंतु प्रशासन व संबंधित ठेकेदार दखल घेत नसल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचा संतापदेखील मोरे यांनी व्यक्त केला आहे.