नवी मुंबई : नेरूळमधील एका खासगी रुग्णालयाने तिथल्या ५० कामगारांना कोणतीही पूर्वकल्पना न देता नोकरीवरून काढले आहे. ठेकेदारामार्फत ते त्या ठिकाणी काम करत होते. नेरूळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयाला कामगार पुरवणाऱ्या एक्झिमिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कामगारांसोबत हा प्रकार घडला आहे. ठेकेदारामार्फत रुग्णालयाला २२० कामगार पुरवण्यात आले होते. त्यापैकी ५० कामगारांना अचानक कामावरून काढण्यात आले आहे. ते सर्व जण मनसेच्या संघटनेशी संलग्न होते, असे मनसे महापालिका कामगार सेनेचे अध्यक्ष अप्पासाहेब कोठुळे यांचे म्हणणे आहे.कामगार यापूर्वी आंदोलनात सहभागी झाले होते. तर काही जण लॉकडाउनच्या कालावधीत रजेवर होते. त्यांचे पगार मुख्यमंत्री सहायता निधीत दिले जातील, अशी सूचना फलकावर नोटीस लावून जाणीवपूर्वक त्यांचा छळ केला जात असल्याचाही आरोप आहे. यानुसार मनसेच्या कामगार सेनेतर्फे कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. महापालिका व पोलिसांकडेदेखील तक्रार करून गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.।एक्झिमिस कंपनीकडून मात्र कामगारांना काढण्यात आले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अज्ञात व्यक्तीने कामगारांना एकत्र करून आपण सांगेपर्यंत कामावर न येण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रत्यक्षात कंपनीकडून अशा प्रकारचे पाऊल उचलले गेले नसल्याचेही कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ डहाके यांनी पत्राद्वारे कळवले आहे.
रुग्णालयातील ५० कामगारांना डच्चू, मनसेची कामगारमंत्र्यांकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 1:26 AM