दरोड्यासाठी तीन जिल्ह्यांतील बँकांची ‘त्यांनी’ केली टेहळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 02:17 AM2017-12-09T02:17:55+5:302017-12-09T02:18:19+5:30
बडोदा बँक लुटण्यापूर्वी सदर टोळीने तीन जिल्ह्यांतील बँकांची टेहळणी केल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, लॉकर असलेली व बाजूचा गाळा रिकामा असलेली बँक जुईनगरमध्ये दिसल्याने त्यांनी तिथला गाळा भाड्याने घेतला
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : बडोदा बँक लुटण्यापूर्वी सदर टोळीने तीन जिल्ह्यांतील बँकांची टेहळणी केल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, लॉकर असलेली व बाजूचा गाळा रिकामा असलेली बँक जुईनगरमध्ये दिसल्याने त्यांनी तिथला गाळा भाड्याने घेतला; परंतु भुयार खोदून लॉकर फोडत असताना एक कामगार पळाल्याने भांडाफोड होण्याच्या भीतीने त्यांनी आवरते घेत एक दिवस अगोदरच पळ काढला.
बँकांच्या सुरक्षेचे धिंदोडे काढणारी राज्यातील पहिली बँक लुटीची घटना गतमहिन्यात जुईनगर येथे घडली. त्याकरिता गुन्हेगारांच्या टोळीने काही महिने तीन जिल्ह्यांतील बँकांची टेहळणी केल्याचे तपासात पुढे आले आहे. हाजीद अली सबदर अली मिर्जा बेग (४५) उर्फ अज्जू याने हा कट रचला होता. हाजीद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मुंबई, ठाणे तसेच पुणे या ठिकाणी घरफोडी व इतर प्रकारचे ८० गुन्हे दाखल आहेत. तर त्याच्या टोळीतील सदस्यांवरही राज्यात व राज्याबाहेर १५०हून अधिक गुन्हे दाखल आहेत. याच साथीदारांच्या मदतीने त्याने मोठी घरफोडी करण्याचा बेत आखला होता. याकरिता त्यांनी मुंबई, ठाणे, रायगड परिसरातील बँकांची टेहळणी केली. झारखंडच्या टोळीने हरयाणा येथे ज्या पद्धतीने बँक लुटली होती, त्याच पद्धतीने बँक लुटण्याचा त्यांचा प्रयत्न होता. याकरिता ज्या बँकांमध्ये लॉकर असतील व बाजूला रिकामा गाळा असेल, अशा बँकेच्या ते शोधात होते. मात्र, दीड ते दोन महिने शोधाशोध केल्यानंतर त्यांना अखेर जुईनगरमध्ये अपेक्षित बँक सापडली. बडोदा बँकेत लॉकर असून बाजूचा गाळाही रिकामा होता. यामुळे दोन महिन्यांपूर्वी मृत पावलेल्या भवरसिंग राठोड याच्यामार्फत त्याने तो गाळा भाड्याने घेतला. त्यानंतर उत्तर प्रदेशमधून कामगार बोलावून त्यांच्याकडून भुयार खोदण्याचे काम सुरू केले. चार ते पाच महिने खोदकाम केल्यानंतर शेवटच्या टप्प्याचे शिल्लक काम त्यांनी बँकेला सलग तीन दिवस सुट्टी असल्याची संधी साधून केले. या वेळी हाजीद हा त्या ठिकाणी आलेला होता. मात्र, लॉकर रूममध्ये घुसल्यानंतर त्यांनी रात्रभर काही लॉकर ग्राइंडर मशिनने फोडण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याच्या आवाजामुळे पकडले जाण्याची भीती भुयार खोदण्यासाठी आलेला कामगारांनी व्यक्त केली होती. त्यामुळे दुसºया दिवशी स्क्रूड्रायवरने लॉकर उघडण्याचे त्यांनी ठरवले.
परंतु स्क्रूड्रायवर खरेदीसाठी तिघे ेजण बाहेर गेले असता, त्यापैकी कमलेश वर्मा याने (३५) संधी साधून पळ काढला. यामुळे हाजीदने तो दिवस व रात्र उर्वरित साथीदारांच्या मदतीने स्क्रूड्रायवरने लॉकर उघडून त्यातील ऐवज लुटला. मात्र, पळालेल्या वर्माकडून कटाची वाच्चता होण्याच्या शक्यतेने त्यांनी एक दिवस अगोदरच पळ काढावा लागला. अन्यथा बँकेतील उर्वरित लॉकरही फोडून त्यांनी ५ ते ६ कोटींहून अधिक ऐवज त्यांनी चोरला असता.