लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : खाडीकिनारी असलेल्या तलावात बुडून दोघा लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. दोघेही घणसोलीचे राहणारे असून खाडीकिनारी मासेमारीसाठी तयार केलेल्या तलावात ते पोहण्यासाठी गेले होते. यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. घणसोली सेक्टर १५ येथील खाडीकिनारी मासेमारीसाठी वापरात असलेल्या तलावाच्या ठिकाणी मंगळवारी दुपारी ही घटना घडली. घणसोली चिंचआळी येथे राहणारी काही अल्पवयीन मुले त्याठिकाणी पोहण्यासाठी गेली होती. त्यांच्यासोबत युवराज थापा (१५) व हितेश क्षत्रीय (१२) हे दोघेही त्याठिकाणी गेले होते. परंतु पाण्यात पोहत असताना खोलीचा अंदाज न आल्यामुळे युवराज व क्षत्रीय पाण्यामध्ये बुडाले. यावेळी घाबरलेल्या इतर मुलांनी त्यांच्या मदतीसाठी आरडाओरडा केला. काही अंतरावरच असलेल्या व्यक्तींनी त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत दोघेही पाण्यात बुडाल्याने मदतकर्त्यांच्या हाती त्यांचे मृतदेहच लागले. दोन्ही मुलांचे मृतदेह वाशीतील पालिका रु ग्णालयात शवविच्छेदनानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.
तलावात बुडून दोघांचा मृत्यू
By admin | Published: May 11, 2017 2:20 AM