महापालिका शाळांमध्ये ई-लर्निंगची सुविधा, ४५ हजार विद्यार्थ्यांना होणार लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 03:27 AM2018-07-06T03:27:08+5:302018-07-06T03:27:21+5:30
महापालिका शाळांमधील ४५ हजार विद्यार्थ्यांना अत्याधुिनक शिक्षण देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. ५६ शाळांमधील तब्बल ६०० वर्गखोल्या व्हर्च्युअल क्लासरूम स्वरूपात रूपांतरित केल्या जात असून, शहरातील तीन शाळांना भेटी देऊन आयुक्तांनी तेथील सुविधांची पाहणी केली.
नवी मुंबई : महापालिका शाळांमधील ४५ हजार विद्यार्थ्यांना अत्याधुिनक शिक्षण देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. ५६ शाळांमधील तब्बल ६०० वर्गखोल्या व्हर्च्युअल क्लासरूम स्वरूपात रूपांतरित केल्या जात असून, शहरातील तीन शाळांना भेटी देऊन आयुक्तांनी तेथील सुविधांची पाहणी केली.
महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक शाळेमध्ये पटसंख्येनुसार संगणक उपलब्ध करून दिले जात आहेत. अत्याधुनिक स्वरूपात कॉम्प्युटर लॅब तयार केली जात आहे. कोपरखैरणे सेक्टर ५मधून मनपा शाळा क्रमांक ३५ व ७२मध्ये प्रायोगिक स्वरूपात लॅब उभारण्यात आली असून, आयुक्त रामास्वामी एन. यांनी पाहणी केली. दिवाळे येथील मनपा शाळेलाही आयुक्तांनी भेट देऊन स्मार्ट बोर्डची पाहणी केली व अभ्यासक्रमाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या. सीबीडी सेक्टर ८मधील मनपा शाळेला भेट देऊन सीएसआरमधून उभारण्यात आलेल्या कॉम्प्युटर लॅबचीही पाहणी केली. या वेळी अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण, शिक्षण अधिकारी
संदीप संगवे, कार्यकारी अभियंता अजय संख्ये, संजय देसाई उपस्थित होते.
आधुनिक माहिती तंत्रयुगाला सामोरे जाताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी स्मार्ट असावेत, या दृष्टीने ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. मनपाच्या शाळांमधील ६०० वर्गखोल्या व्हर्च्युअल क्लासरूममध्ये रूपांतर करणारी व प्रत्येक शाळेत संगणक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणारी नवी मुंबई पहिली महापालिका ठरणार असल्याची माहिती आयुक्तांनी या वेळी दिली.