नवी मुंबई : पालिकेने उभारलेल्या ई-टॉयलेटच्या पाण्याचा वापर वाहने धुण्यासाठी होत असल्याचे दिसून येत आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील तळवली नाका येथे तसेच शहरातील इतरही ठिकाणी हा प्रकार सुरू आहे. मात्र, त्या ठिकाणी उघडपणे पाण्याचा अपव्यय होत असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
पालिकेच्या वतीने नागरिकांच्या सोयीसाठी जागोजागी ई-टॉयलेट उभारण्यात आले आहेत. त्यापैकी ठाणे-बेलापूर मार्गावरील तळवली नाका येथील ई-टॉयलेटचे सर्व्हिस सेंटरमध्ये रूपांतर झाले आहे. त्या ठिकाणी शौचालयासाठी पुरवण्यात आलेल्या पाण्याची चोरी करून ते वाहने धुण्यासाठी वापरले जात आहे. यानुसार रात्रंदिवस त्या ठिकाणी रिक्षांसह इतर खासगी वाहने धुतली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याकरिता दररोज पालिकेच्या लाखो लीटर पाण्याचा वापर केला जात आहे, याकरिता झोपडपट्टी भागातील लहान मुलांचाही वापर केला जात आहे. विशेष म्हणजे, रहदारीच्या मुख्य मार्गालगतच उघडपणे सुरू असलेल्या या प्रकाराची चाहूल पालिकेच्या अधिकाऱ्यांना लागली नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. एकीकडे शहरात पाणीबचतीचा संदेश दिला जात आहे. वापराविना असलेल्या या ई-टॉयलेटसाठी पुरवण्यात आलेले पाण्याची चोरी होताना दिसू लागली आहे.
अशाच प्रकारे नेरुळ सेक्टर २ येथेही पालिकेच्या जलवाहिनीतून पाण्याची चोरी करून ते वाहने धुण्यासाठी विकले जात असल्याच्याही तक्रारी प्राप्त होत आहेत. संभाजी राजे उद्यानालगत दररोज सकाळी वाहने धुण्यासाठी रांग लागलेली असते. त्यांना पाच रुपयांना एक बादली या दराने चोरीच्या पाण्याची विक्री होत असल्याचे दिसून येत आहे.रहदारीच्या मुख्य रस्त्यावर वाहने धुण्याचा प्रकार उघडपणे सुरू आहे. मात्र याबाबत नवी महापलिकेच्या अधिकाऱ्यांना कल्पना नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी वाहनांचे सर्व्हिस सेंटरच सुरू केल्याचा दिसून येत आहे.शहरात स्वच्छ अभियान अंतर्गत लाखो रुपये खर्चून पालिकेने ई-टॉयलेट उभारले आहेत; परंतु अनेक ठिकाणी ई-टॉयलेटची निगा योग्यप्रकारे राखली जात नसल्याने, त्याचा वापर करण्याकडे नागरिक पाठ फिरवतानाही दिसत आहेत.