पूर्वी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब सापडायचे, आता सुरक्षित वातावरण: मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 09:09 AM2024-03-16T09:09:04+5:302024-03-16T09:09:45+5:30
६ हजार कोटींच्या कामांचे भूमिपूजन
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : राज्यात पूर्वी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब सापडत होते. आता उद्योगांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना येथे अप्रत्यक्षपणे लगावला. राज्यात नवीन उद्योग येत असून, कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सिडको क्षेत्रामधील ५ हजार कोटी व नवी मुंबई महानगरपालिकेच्या १,१२९ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. राज्याची औद्योगिकदृष्ट्या भरभराट सुरू आहे. नवीन उद्योग येत आहेत. गुंतवणूक वाढत आहे. राज्यातील उद्योग पळविले जात असल्याचे बोलणाऱ्यांच्या काळातच उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब सापडत होते. आता संपूर्ण राज्यात सुरक्षित वातावरण आहे. नवीन उद्योगांना सर्व परवाने लवकर मिळवून देण्यासाठी सिंगल विंडो सिस्टम कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रगतीच्या इंजिनची नवी मुंबई अश्वशक्ती नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता व पायाभूत सुविधांच्या बाबतीत उत्तम काम केले आहे. नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविले जात आहेत. राज्याच्या प्रगतीच्या इंजिनची नवी मुंबई अश्वशक्ती असल्याचेही त्यांनी सांगितले.
एमएमआर विभागात नवीन प्रकल्प
सिडकोच्या माध्यमातून विमानतळाचे काम गतीने सुरू आहे. विमानतळाचे काम वेळेत पूर्ण करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात विकासासाठी खूप संधी असून, शासनाच्या माध्यमातून या परिसरात व एमएमआर विभागात नवीन प्रकल्प सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, आ. गणेश नाईक, आ. मंदा म्हात्रे, आ. महेश बालदी, आ. रमेश पाटील, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल उपस्थित होते.