नवी मुंबई : ढोल-ताशांचा गजर व ‘गणपती बाप्पा मोरया...’च्या गजरामध्ये नवी मुंबई, पनवेल परिसरामध्ये गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये ५१३ सार्वजनिक व ७०६४ घरगुती गणेशमूर्तींचे २३ तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले. शहरभर निघालेली मिरवणूक व बाप्पाच्या घोषणांमुळे पूर्ण नवी मुंबई भक्तिमय झाली होती.गणरायाला भक्तिभावाने व निर्विघ्नपणे निरोप देता यावा यासाठी पोलीस व महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. शहरातील २३ विसर्जन स्थळांवर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. स्वयंसेवक, अग्निशमन दलाचे कर्मचारी तैनात केले होते. तलावांकडे जाणाºया रोडची विशेष डागडुजी करण्यात आली होती. खड्डे बुजविण्यात आले होते. पोलिसांनी आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. वाशीतील शिवाजी चौकासह तलाव परिसरातील वाहतूक इतर मार्गांवर वळविण्यात आली होती. घरगुती गणपतींचे सकाळपासूनच विसर्जन सुरू झाले होते. दुपारनंतर सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका सुरू झाल्या. पुणे, सातारा व इतर परिसरामधून ढोल पथके पाचारण करण्यात आले होते. ढोल-ताशांचा गजराने आसमंत दणाणून गेला होता. विसर्जन स्थळांवर व वाशीतील शिवाजी चौकामध्ये बाप्पावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. रात्री १२ पर्यंत वाशी व इतर तलावांवर भक्तांची प्रचंड गर्दी होती. यानंतर गर्दी ओसरू लागली.महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली परिमंडळ एकचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार व परिमंडळ दोनचे उपआयुक्त डॉ. अंबरीश पटनिगिरे यांच्यासह संपूर्ण विसर्जन स्थळांवर लक्ष ठेवण्यात आले. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महापौर सुधाकर सोनावणे, आमदार मंदा म्हात्रे, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, माजी खासदार संजीव नाईक, सभागृह नेते जयवंत सुतार, संगीता बोºहाडे, अंजली वाळुंज, गिरीश म्हात्रे, प्रकाश मोरे, राजू शिंदे, उपआयुक्त किरणराज यादव, तुषार पवार व इतर अधिकाºयांनी उपस्थित राहून पुष्पवृष्टी केली.
पुढच्या वर्षी लवकर या...नवी मुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 2:50 AM