उत्सवाला ओहोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 01:07 AM2017-08-16T01:07:11+5:302017-08-16T01:07:13+5:30

कायद्याचा धाकामुळे आयोजकांनी हात आखडता घेतल्याने यंदा प्रथमच दहीहंडीचा उत्साह मावळल्याचे पाहायला मिळाले.

Ebb eve | उत्सवाला ओहोटी

उत्सवाला ओहोटी

googlenewsNext

नवी मुंबई : कायद्याचा धाकामुळे आयोजकांनी हात आखडता घेतल्याने यंदा प्रथमच दहीहंडीचा उत्साह मावळल्याचे पाहायला मिळाले. सकाळीच हंडी उभारूनदेखील अनेक मंडळाच्या ठिकाणी दुपारपर्यंत शुकशुकाट पसरलेला होता. अशातच साउंड आणि लाइट व्यावसायिकांच्या संपामुळे डीजेविनाच आयोजकांना कार्यक्रम उरकावा लागला.
कायद्याच्या बंधनामुळे दहीहंडी आयोजक आणि गोविंदा पथकांच्या उत्साहाला ओहोटी लागल्याचे पाहायला मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत शहरातील बहुतांश महत्त्वाच्या हंड्या रद्द झाल्या आहेत. यामुळे शहरात महत्त्वाच्या अवघ्या तीन ठिकाणी दहीहंड्या रचण्यात आल्या होत्या. ऐरोली येथे सुनील चौगुले स्पोर्ट्स क्लब, कोपरखैरणे येथे वन वैभव कला क्रीडा निकेतन, तर वाशीत माजी नगरसेवक भरत नखाते यांच्यातर्फे हंडी उभारण्यात आली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा शहरातील अनेक महत्त्वाच्या हंड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नेरुळ येथे नगरसेवक रवींद्र इथापे यांच्यातर्फे उभारली जाणारी हंडी रद्द करण्यात आली आहे. शिवाय, नगरसेवक नामदेव भगत यांनीही यंदाची हंडी रद्द करून लोकोपयोगी उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर ऐरोली येथील नगरसेवक मनोहर मढवी यांच्या वतीने उभारली जाणारी हंडी रद्द करण्यात आली आहे.
>पोलिसांनी आदिवासींबरोबर फोडली दहीहंडी
पनवेल तालुका पोलीस ठाणे व रोटरी क्लब आॅफ पनवेल सेंट्रल यांनी तालुक्यातील कोंबळटेकडी येथील आदिवासींसोबत अनोख्या पद्धतीने दहीहंडी साजरी केली. या वेळी तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते.
तालुक्यातील आदिवासी आजही सोई-सुविधांपासून वंचित आहेत. तालुका पोलिसांनी कोंबळटेकडी ही आदिवासीवाडी दत्तक घेतली आहे. येथील वाडीतील आदिवासी बांधवांना पोलीस ठाणे व रोटरी क्लब सोई-सुविधा पुरवत आहे. त्यातच १५ आॅगस्ट रोजी गोपाळकाला सण आल्याने तालुका पोलीस व रोटरी क्लब सेंट्रल पनवेल यांनी स्वातंत्र्यदिन व दहीहंडी आदिवासी बांधवांसोबत साजरी केली.
या वेळी जेवणाचे साहित्य, ताट, ग्लास, फिल्टर, स्पोर्ट्स साहित्य, शैक्षणिक साहित्य, रोटरी क्लबतर्फे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला दिले. तर पोलिसांनी वाडीतील आदिवासी बांधवांना स्मार्ट स्टोव्ह वाटप केले.
पनवेलपासून १५ ते २० किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंबळ टेकडी या आदिवासीवाडीवर पहिल्यांदाच अशा प्रकारे दहीहंडी फोडून व उपयोगी वस्तू वाटप करून, स्वातंत्र्यदिन साजरा केल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले. वाडीतील लहानग्यासोबत पोलिसांनी हंडीदेखील फोडली. या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. आवटे, तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे उपस्थित होते.
>संपाचा फटका आयोजकांना
हंडीच्या ठिकाणी प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी आयोजकांकडून अनेक प्रकारच्या शक्कल लढवल्या जायच्या. त्यापैकी डीजे महत्त्वाचा भाग ठरला होता; परंतु यंदा प्रथमच दहीहंडी आयोजकांना दर वाढवूनही डीजे मिळाला नाही. साउंड व लाइट व्यावसायिकांच्या पाला या संघटनेने राज्यव्यापी संप पुकारल्याने दहीहंडी आयोजकांना हा फटका बसला.
शहरातील प्रमुख समजल्या जाणाºया या हंड्या आहेत. या हंड्या फोडणे प्रतिष्ठेचे समजून नवी मुंबईसह, मुंबई, पुणे, ठाणे येथील गोविंदा पथके नवी मुंबईत प्रतिवर्षी हजेरी लावत.
मात्र यंदा आयोजकांनी हंड्या रद्द केल्यामुळे गोविंदा पथकांनीही शहराकडे पाठ फिरवल्याने दुपारपर्यंत अनेक ठिकाणी शुकशुकाट पसरला होता.
नेरेपाडा गावाची
एक हंडी, एक उत्सव
पनवेल तालुक्यातील नेरेपाडा गावाची एक हंडी, एक उत्सव दरवर्षी अनोख्या पद्धतीत पाहावयास मिळतो. अनेक वर्षांपासूनची परंपरा आजही येथे जपून ठेवली आहे. दरवर्षीप्रमाणे गावात जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. ‘कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या’ आणि ‘गोविंदा रे गोपाळा, यशोदाच्या तान्ह्या बाळा,’ या गजरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यात आला.
श्रीकृष्णाचे गोकुळ दृश्य स्वरूपात करण्यात आले होते. अनेक प्रकारची पात्र दाखवून हंडी फोडण्यात आली. या वेळी वरु णराजाने जोरदार हजेरी लावली. ही दहीहंडी बाळगोपाळांनी फोडली. राधा व गोपिकेच्या वेशात विद्यार्थिनी उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. या वेळी गावातील ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
>प्रतिवर्षी दहीहंडीवर न्यायालयाचे वेगवेगळे निर्बंध येऊ लागले आहेत. अशा वेळी दहीहंडी साजरी करताना एखाद्याकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास त्याचे परिणाम आयोजक मंडळावर उमटू शकतात. शिवाय गोविंडा पडून जखमी होण्याचेही प्रकार मनाला लागणारे आहेत. यामुळे हंडी रद्द करून त्यावर खर्च होणारा निधी इतर लोकोपयोगी उपक्रमावर खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.
- नामदेव भगत,
संस्थापक,
नामदेव भगत चॅरिटेबल स्ट्रस्ट

Web Title: Ebb eve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.