कर्नाळा अभयारण्यात ‘इको टुरिझम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 10:57 PM2019-07-07T22:57:42+5:302019-07-07T22:57:53+5:30

पालकमंत्र्यांसमोर प्रकल्पाचे सादरीकरण

'Echo Tourism' in Karnala Wildlife Sanctuary | कर्नाळा अभयारण्यात ‘इको टुरिझम’

कर्नाळा अभयारण्यात ‘इको टुरिझम’

googlenewsNext

- अरुणकुमार मेहत्रे


कळंबोली : पनवेलमधील कर्नाळा पक्षी अभयारण्यात दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे. पर्यटनस्थळ म्हणून या क्षेत्राचा विकास करण्यासाठी याठिकाणी मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात येत असून आता इको टुरिझम विकसित करण्यात येणार आहे.


निसर्ग पर्यटन विकास मंडळाकडून पाच कोटींचा निधी मंजूर सुध्दा झाला आहे. परंतु याकरिता साडेअकरा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमोर आराखड्याचे सादरीकरण केले. याकरिता लागणाºया उर्वरित निधीसाठी राज्याचे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. त्यामुळे हा प्रकल्प लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.


मुंबईपासून काही तासाच्या अंतरावर असलेल्या कर्नाळा उंचावर असल्याने येथील हवाही नेहमी थंड असते. कर्नाळा अभयारण्यात दोन प्रकारची वने आहेत. याशिवाय, रानखाटीक, ठिपकेवाला सातभाई, कस्तुर, शिंपी, गिधाड, मुनिया, नाचन, सुगरण, बया, सुरेल, खाचू कवटा, राखी धोबी, भारतव्दाज, शामा, मोर, फुलटोचा, पावशा,बहिरा, कापशी घार, नीळकंठ पोपट, सूर्यपक्षी, हरियल यासारखे सुमारे १३४ प्रजातीचे स्थानिक तर ३८ प्रजातीचे स्थलांतरीय पक्षी आहेत.


मुंबई- गोवा महामार्ग बाजूने जात असल्याने पर्यटकांसह प्रवासीही याठिकाणी आवर्जून थांबतात. याठिकाणी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.के राव, ठाणे येथील वन्यजीव संरक्षण अधिकारी दादासाहेब शेडगे यांनी पुढाकार घेवून इको टुरिझमची संकल्पना मांडली . त्यानुसार वास्तुविशारद इंद्रजीत नागेशकर यांनी आराखडा तयार केला आहे. तो निसर्ग पर्यटन महामंडळाकडे गतवर्षी सादर करण्यात आला होता. त्यानुसार यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. परंतु हा प्रकल्प पूर्णत्वास करण्यासाठी साडेअकरा कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर वनपरिक्षेत्र अधिकारी पी. पी. चव्हाण यांनी, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे दोन दिवसापूर्वी प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण केले. यासाठी लागणारा उर्वरित निधी आपण राज्य शासनाकडून उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन चव्हाण यांनी दिले. यावेळी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीच्या विश्वस्त महेश बालदी उपस्थित होते.

कर्नाळा अभयारण्यातील प्रस्तावित सुविधा
सुरक्षा केबिन, चेंजिंग रूम, उपाहारगृह, ९ डी थिएटर, संग्रालय, युवक गृह, कॉटेज, अ‍ॅडव्हेंचर पार्क, डेक, ट्री हाऊस, पाथ वे, लाकडी ब्रिज, व्ही.व्ही. विंग, धबधबे आदी सुविधा या ठिकाणी आहेत. याकरिता दहा ते पंधरा एकर जागेची आवश्यकता आहे. ती अभयारण्यात उपलब्ध असून रोडच्या पश्चिम भागात हा प्रकल्प राबवला जाणार आहे.

कर्नाळ्याच्या ट्रेकिंगचा थरार
वयोवृध्द, अपंग त्याचबरोबर महिलांना ट्रेकिंग करता येणे कठीण आहे. अशांना कर्नाळा किल्ल्याच्या सैरचा अनुभव ९ डी थिएटरमध्ये घेता येणार आहे. त्या अनुषंगाने सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Web Title: 'Echo Tourism' in Karnala Wildlife Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.