नवी मुंबई : नवी मुंबई शहरांतर्गत वाहनांची वर्दळ असलेला पामबीच मार्ग अवघ्या दोन वर्षांत ठिकठिकाणी खडबडीत झाला असून, खड्डे पडले आहेत. या प्रकाराकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून, खड्ड्यांमुळे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सीबीडी ते वाशी, तसेच शहरातील इतर भागात ये-जा करण्यासाठी नागरिक पामबीच मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. २००० साली सिडकोने पामबीच निर्मिती केलेल्या या मार्गाचे हस्तांतरण २००७ साली सिडकोने पालिकेकडे केले होते. या मार्गाच्या हस्तांतरणाच्या वेळी या मार्गावर डांबरीकरण करण्यात आले होते. यासाठी सिडकोने जवळपास १४ कोटी रुपये खर्च केले होते. २०१७ साली पावसाळ्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते, तसेच रस्त्यावरील डांबर ठिकठिकाणी उखडल्यामुळे रस्ता खडबडीत झाला होता. तेव्हा या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी ५० कोटींपेक्षा जास्त खर्च येणार होता. पैशाची, वेळेची बचत करण्याच्या दृष्टीने या मार्गावर मायक्रो सर्फेसिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या अत्याधुनिक तंत्रप्रणालीसाठी सुमारे ९ कोटींचा खर्च करण्यात आला होता. या कामाला पालिकेच्या महासभेची मंजुरी मिळाली होती. या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने संबंधित रस्ता किमान ७ वर्षांची टिकण्याची गॅरंटी दिली होती. २०१८ साली या प्रणालीद्वारे रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले, परंतु दरवर्षी पावसाळ्यात पामबीच मार्गावर विविध ठिकाणी खड्डे पडत असून, अनेक ठिकाणचा रस्ता खडबडीत होत आहे.या वर्षीही नेरुळ जंक्शन, मोराज सर्कल, सीवूड सर्कल वाशीकडे जाणाºया दिशेने रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. मार्गावर ठिकठिकाणी रस्ता खडबडीत झाला असून, अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली असून, या प्रकाराकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.