पर्यावरणप्रेमी चालकाने रिक्षातच फुलवली बाग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 01:39 AM2019-12-26T01:39:03+5:302019-12-26T01:39:27+5:30

प्रवाशांनाही प्रोत्साहन : करावेतील रिक्षाचालकाचा स्तुत्य उपक्रम

Eco-friendly driver has set up a garden in the space | पर्यावरणप्रेमी चालकाने रिक्षातच फुलवली बाग

पर्यावरणप्रेमी चालकाने रिक्षातच फुलवली बाग

Next

नवी मुंबई : पर्यावरणाप्रति आपले प्रेम व्यक्त करत करावेतील रिक्षाचालकाने रिक्षातच बाग फुलवली आहे. सुमारे दहा प्रकारच्या वृक्षांची कुंडीत लावगड करून त्याची रिक्षात सजावट केली आहे. त्यामुळे ही रिक्षा प्रवाशांसह निसर्गप्रेमींचे आकर्षण ठरत आहे.

वाढत्या शहरीकरणाचा फटका पर्यावरणाला बसत चालला आहे. इमारती व घरांसाठी वृक्षतोड होत असून, दुकानांसमोर असलेली झाडेही तोडली जात आहेत. याचे परिणाम निसर्गचक्रावर उमटत असून भविष्यात मानवी जीवनावरही त्याचे परिणाम दिसून येणार आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावर वृक्षलागवडीवर भर दिला जात आहे. याचीच दखल घेत नवी मुंबईकरांनाही निसर्गाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करावेतील रिक्षाचालक उमर खान यांच्याकडून होत आहे. हल्ली झाडे लावण्यासाठीही घरापुढे मोकळी जागा शिल्लक ठेवली जात नाही ये. त्यामुळे स्वत:ची रिक्षा घेतल्यावर त्यातच बाग फुलवणार असा त्यांचा संकल्प होता आणि तो त्यांनी काही महिन्यांपूर्वी प्रत्यक्षात साकारलाही आहे. यासाठी त्यांनी तब्बल २२ हजार रुपये खर्चून तशा पद्धतीचे आवश्यक बदल रिक्षात करून घेतले आहेत. त्यानुसार रिक्षात कुंडी ठेवून त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फुले व फळझाडांची लागवड केली आहे. त्यामध्ये गुलाबासह लिंबू, फणस, बटाटा यासह शोभिवंत मनी प्लांट चा समावेश आहे. तर रिक्षाच्या वुडवरही हिरवा गालिचा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे ही हरित रिक्षा प्रवाशांना आकर्षित करत असून, निसर्गप्रेमींचेही लक्ष खेचून घेत आहे. एकीकडे नागरिक दारासमोर असलेले वृक्षही तोडत असताना, दुसरीकडे रिक्षातच बाग फुलवणारा पर्यावरणप्रेमी पाहायला मिळत आहे. त्यांच्याकडून रिक्षात बसणाऱ्या प्रवाशांनाही वृक्षलागवडीचा संदेश दिला जात आहे. जरी मोठे वृक्ष लावण्यासाठी जागा नसली, तरीही खिडकीतल्या जाळीत कुंडीत का होईना; परंतु छोटे-मोठे वृक्ष लावण्याचा सल्ला त्यांच्याकडून दिला जात आहे. यामुळे थोड्याफार जरी प्रवाशांनी वृक्ष संवर्धनावर भर दिली, तरीही बºया प्रमाणात पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सिमेंटच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे रिक्षात छोटीशी बाग फुलवण्याचे आपले स्वप्न होते. ते प्रत्यक्षात साकारत वेगवेगळी फुले व फळझाडे कुंडीत लावून रिक्षात बाग तयार केली आहे. यामुळे काही प्रमाणात प्रदूषणाला आळा बसुन प्रवाशांनाही प्रसन्न करण्यास हातभार लागत आहे.
- उमर खान, रिक्षाचालक
 

Web Title: Eco-friendly driver has set up a garden in the space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.