- कमलाकर कांबळेनवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सुमारे दोन हजार कोटींची प्रकल्पपूर्व कामे हाती घेण्यात आली आहे. या कामांसाठी लाखो वृक्षांची कत्तल केली जाणार आहे. विशेष म्हणजे प्रकल्पामुळे किती झाडे तोडली जाणार आहेत, याची कोणतीही नोंदणी सिडकोकडे नाही किंवा त्याचे सर्वेक्षण अर्थात वृक्षगणनाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे या विषयावर पर्यावरणप्रेमी आक्रमक झाल्याने याचा फटका विमानतळ प्रकल्पाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ११६0 हेक्टर जागेवर सुमारे पंधरा हजार कोटी रुपये खर्च करून ग्रीडफिल्ड पद्धतीने हे विमानतळ उभारले जाणार आहे. या विमानतळाचा चार टप्प्यात विकास करण्यात येणार आहे. २0१९ पर्यंत विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे सिडकोचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार सिडकोने कंबर कसली आहे. त्यानुसार प्रकल्पपूर्व सुमारे दोन हजार कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात आली आहेत. यात जमिनीचे सपाटीकरण, उलवे नदीचे पात्र बदलणे व विमानतळाच्या मार्गात मुख्य अडथळा ठरणाºया उलवे टेकडीची उंची कमी करणे या कामांचा समावेश आहे. पुढील अठरा महिन्यांत ही कामे पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर विमानतळाच्या प्रत्यक्ष उभारणीसाठी ही जमीन जीव्हीके या मुख्य कंत्राटदाराच्या सुपूर्द केली जाणार आहे. त्याअनुषंगाने कामाला गती देण्यात आली आहे. असे असले तरी या क्षेत्रातील लाखो वृक्षांचे काहीच नियोजन केले नसल्याचे दिसून आले आहे. प्रकल्पाचे काम हाती घेण्यापूर्वी या क्षेत्रातील वृक्षांचे सर्वेक्षण करून त्यांच्या पुनर्राेपणाचे नियोजन करणे आवश्यक होते. मात्र अद्यापि सिडकोकडून वृक्षांचे सर्वेक्षण झालेच नसल्याचे समोर आले आहे. याविषयीची माहिती उपलब्ध नसल्याची कबुली सिडकोने माहितीच्या अधिकारातील उत्तरात दिली आहे.विमानतळ प्रकल्पासाठी दहा गावे स्थलांतरित होणार आहेत. या गावांत आणि परिसरात मोठ्या प्रमाणात जुनी झाडे आहेत. ही गावे स्थलांतरित करताना या वृक्षांचे काय करणार, असा सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे. तर या विरोधात हरित लवादाकडे तक्रार करणार असल्याचेसामाजिक कार्यकर्ते संजय सुर्वे यांनी सांगितले.प्रकल्पासाठी विविध ४० परवानग्यानवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी आतापर्यंत विविध विभागाच्या जवळपास ४0 परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. विमानतळबाधित क्षेत्रातील वृक्षांचे सर्वेक्षण करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. सध्या सुरू असलेल्या प्रकल्पपूर्व कामांमुळे एकाही वृक्षाची हानी होणार नाही, याची दक्षता घेतली जात असल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.वृक्षांचे सर्वेक्षण करण्याची मोहीम सुरू आहे. विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणाºया वृक्षांचे कोठे पुनर्राेपण करायचे याचे नियोजन सिडकोकडून केले जात आहे. त्यासाठी कोणत्याही बाह्य प्राधिकरणाची मंजुरी घेण्याची आवश्यकता नाही. सिडकोची त्यासाठी पर्यावरणविषयक स्वतंत्र कमिटी आहे. त्या कमिटीच्या माध्यमातून हा निर्णय घेतला जाणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले आहे.
विमानतळासाठी वृक्षकत्तल?पर्यावरणप्रेमी संघटना सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 7:28 AM