नवी मुंबई : पर्यावरण संवर्धनासाठी सध्या जागतिक स्तरावर मोठा जागर सुरू आहे. व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात आहे. उत्सवही इकोफ्रेंडली झाले आहेत. आता लग्नाच्या पत्रिकाही पर्यावरणपूरक बनल्या आहेत. वाशी येथील एका पित्याने आपल्या मुलीच्या लग्नासाठी चक्क झेंडूच्या (मेरीगोल्ड) बीजाची लग्नपत्रिका बनवून घेतली आहे. घरातील मंगलकार्यातही पर्यावरण संतुलनाचे भान ठेवणाऱ्या या पित्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
वाशी येथील रहिवासी असलेले शिवराम कृष्णन अय्यर व पुष्पा अय्यर यांच्या नताशा या धाकट्या मुलीचा विवाह १८ जानेवारी रोजी संपन्न होत आहे. नताशा ही न्यूझिलंडमध्ये लॅण्ड स्कॅप आर्किटेक्ट म्हणून काम करते. कोणत्याही विकास प्रकल्पापूर्वी निसर्गाचा ºहास होऊ नये, या दृष्टीने नताशा व तिची टीम काम करते. यातूनच प्रेरणा घेऊन स्वत:च्या लग्नाची पर्यावरणपूरक लग्नपत्रिका छापण्याची संकल्पना तिला सुचली. अय्यर दाम्पत्यांना ही संकल्पना चांगलीची भावली. त्यानुसार त्यांनी झेंडूच्या बियांचे अंतर्गत अस्तर असलेल्या हॅण्डमेड कागदापासून लग्नपत्रिका तयार करून घेतल्या. लग्नपत्रिकेवर देवी-देवतांचे फोटो लावले जातात. अलीकडच्या काळात गणेशाची मूर्ती चिकटवण्याची पद्धत रूढ झाली आहे. विवाह कार्य संपल्यानंतर या पत्रिका फेकून दिल्या जातात, त्यामुळे त्यावरील देवी-देवतांची विटंबना होते. या परंपरेला छेद देण्याबरोबरच मंगलकार्यातून पर्यावरणाचे महत्त्व कळावे, या उद्देशाने इकोफ्रेंडली लग्नपत्रिकेचा पर्याय उत्तम असल्याचे शिवराम कृष्णन अय्यर व त्यांच्या पत्नी पुष्पा अय्यर सांगतात.
इकोफ्रेंडली लग्नपत्रिकेची उपयुक्तताझेंडूच्या बीजापासून तयार केलेली ही लग्नपत्रिका विवाह सोहळ्यानंतर फेकून देण्याची गरज नाही. ही लग्नपत्रिका फाडून किंवा तशीच्या तशी घरातील फुलझाडांच्या कुंडीत टाकावी. त्याला नियमित पाणी दिल्यास पुढील काही दिवसांत कुंडीत झेंडूचे रोपटे उगवेल. या संदर्भातील माहिती लग्नपत्रिकेच्या मागील बाजूस छापण्यात आली आहे. तसेच मित्रमंडळी आणि आप्तेष्टांना लग्नपत्रिका देताना अय्यर दाम्पत्य त्यांना या बाबत अवर्जून माहिती देत आहेत.