मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई असली तरी भविष्यातील विकास केंद्र हे नवी मुंबईत असेल. तेथे उभ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासह अन्य महत्त्वाच्या विकासकामांमुळे नवी मुंबईला अपार महत्त्व येईल, असे सीबीआरई या मानांकन देणाऱ्या संस्थेने त्यांच्या अभ्यासात म्हटले आहे.आर्थिक राजधानी मुंबईच्या निमित्ताने नवी मुंबई आता जगाच्या आर्थिक नकाशावर येत आहे. पायाभूत सुविधांमुळे मागील दहा वर्षातनवी मुंबईचे आर्थिकदृष्ट्या महत्त्व वाढत आहे. या सर्वेक्षणानुसार, नवी मुंबईत उभे होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ हा त्या शहराच्या विकासाचा सर्वात मोठा भाग आहे. विमानतळाच्या निमित्ताने उभ्या होणाऱ्या ‘नवी मुंबई एअरपोर्ट प्रभाव क्षेत्र’ अर्थात ‘नैना’ या प्रकल्पामुळे पुढील काळात मुंबईच्या मुख्य भूमितील अनेक उद्योग तिकडे वळण्याची दाट शक्यता आहे. त्याच जोडीला मुंबई ते नवी मुंबई ही समुद्रावरील ट्रान्स हार्बर लिंकही उभी होत आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊ न पुढील काळातील महत्त्वाचे उद्योग व विकास केंद्र नवी मुंबई असेल. सीबीआरईचे भारत व नैऋत्य आशिया प्रमुख अंशुमन मॅनझिन यांच्यानुसार, मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचा नवी मुंबईपर्यंत विस्तार झाला आहे. या प्राधिकरणाने चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात १२,१०० कोटी रुपयांपैकी ८० टक्के रक्कम पायाभूत सुविधांसाठी ठेवली आहे. या भरमसाठ तरतुदीचा नवी मुंबईत विकासकामांना मोठा लाभ होईल. त्यातूनच पुढील दहा वर्षात गुंतवणूक व आर्थिक क्षेत्राचा हब हा नवी मुंबई असेल, असे अभ्यासात दिसले आहे.
आर्थिक राजधानी मुंबई; पण विकास केंद्र नवी मुंबईत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 4:07 AM