उरण : खाजगी क्षेत्रांसोबत, सार्वजनिक उपक्रम व सरकारी संस्थांमध्ये एकाच कामासाठी वेगवेगळे वेतन दिले जाते, काही ठिकाणी किमान वेतन देखील दिले जात नाही. त्यामुळे कामगारांचे शोषण होते ते थांबले पाहिजे, त्याकरिता प्रबळ दबाव निर्माण करावा लागेल. आर्थिक विषमता समृद्ध राष्ट्राच्या निर्मितीतील मोठा अडथळा आहे. जसजशी देशाची प्रगती होत आहे तशी आर्थिक विषमता वाढत आहे. प्रगत व समृद्ध देशाची निर्मिती होत असताना कामगारांचे आर्थिक शोषण व आर्थिक विषमता थांबली पाहिजे असे असे विचार भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघ चे राष्ट्रीय कोषाध्यक्ष कामगार नेते सुधीर घरत यांनी भारतीय मजदूर संघाच्या पाटण्यात संपन्न होत असलेल्या २०व्या त्रैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात व्यक्त केले.
भारतीय मजदूर संघाचे २० वे त्रयवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन पाटण्यातील केशव सरस्वती विद्या मंदिर, पटना येथे ७ ते ९ एप्रिल या कालावधीत संपन्न झाले. या अधिवेशनात भारतीय मजदूर संघाशी संलग्न असणाऱ्या देशभरातील २९ राज्यातील ३८ फेडरेशनचे पदाधिकारी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे नेपाळ देशाने सुद्धा भारतीय मजदूर संघाच्या संघटनेला मान्यता दिली असून तेथील पदाधिकारी अधिवेशनात सहभागी झाले होते .या अधिवेशनाचे उदघाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह तथा भारतीय मजदूर संघाचे पालक के.भाग्ययाजी यांनी केले.
यावेळी भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हिरेन पंड्या, राष्ट्रीय महामंत्री रवींद्र हिमते, पूर्व अध्यक्ष साजी नारायणजी, केंद्रीय संघटन मंत्री बी. सुरेंद्रन, क्षेत्रीय संघटनमंत्री व्ही. राजेश, उद्योग व पोर्ट फेडेरेशन प्रभारी चंद्रकांत ( अण्णा ) धुमाळ व राष्ट्रीय व प्रदेश पदाधिकारी यांच्यासह २३०० पदाधिकारी या अधिवेशतात उपस्थित राहिले. भारतीय पोर्ट ॲण्ड डॉक मजदूर महासंघाच्या वतीने राष्ट्रीय महामंत्री कामगार नेते सुरेश पाटील उपस्थित होते. या अधिवेशनात महिलांकरिता विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. शोषण मुक्त, समता युक्त भारत निर्माण व्हावा याकरिता व महिलांना सामाजिक सुरक्षा मिळावी असे ठराव अधिवेशनात घेण्यात आले. भव्य अशी शोभा यात्रा पटना शहरातून काढण्यात आली, त्याची सांगता सभेने झाली.