लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : तळोजा औद्योगीक वसाहतीमध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. २० दिवसामध्ये १२ वेळा बत्ती गुल झाल्यामुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत. कोल्डस्टोरेज व इतर व्यवसायीकांना विजपुरवठा खंडीत झाल्यामुळे जनरेटरचा वापर करावा लागत आहे. डिझेलसाठी लाखो रूपयांचा भुर्दंड सहन करावा लागत असल्यामुळे उद्योजकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
राज्यातील महत्वाच्या औद्योगीक वसाहतीमध्ये तळोजा एमआयडीसीचा समावेश आहे. जेएनपीटी बंदर जवळ असल्यामुळे कृषी माल व इतर वस्तूंचा साठा करणारी अनेक कोल्ड स्टोरेज या परिसरामध्ये आहेत. याशिवाय इतर अनेक महत्वाचे कारखाने या परिसरात आहे. एमआयडीसीमधील समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये विजेचा लपंडावाचाही समावेश आहे. विजपुरवठा कधी खंडीत होईल याचा काहीच भरोवसा राहिलेला नाही.सोमवारी पहाटे ७.३७ वाजता वीजपुरवठा बंद झाला तो ७.५० ला पुर्ववत झाला. रविवारी सकाळी ९ वाजता विज गेली ती २० मिनीटांनी परत आली. सायंकाळी ९ वाजता विजपुरवठा खंडीत झाल्यानंतर पाऊसतास अंधाराचीच स्थिती होती. मागील २० दिवसामध्ये १२ वेळा अशाप्रकारे लपंडावाला सामोरे जावे लागते आहे. कधी १० ते १५ मिनीट तर कधी १ ते २ तास बत्तीगुलची स्थिती असते.
विजपुरवठा खंडीत झाला की काही कारखान्यांमधील काम पूर्णपणे बंद होते. पण कोल्डस्टोरेज सारख्या उद्योजकांना एक मिनीटही विजपुरवठा बंद ठेवून चालत नाही. कोल्डस्टोरेजमध्ये ठेवलेली फळे, भाजीपाला, मसाल्याचे पदार्थ, मांस व इतर नाशिवंत कृषी व कृषीपुरक वस्तू योग्य तापमानामध्ये ठेवाव्या लागतात. मांस व इतर वस्तूंना उणे तापमान आवश्यक असते. यामुळे विजपुरवठा खंडीत झाला तर उच्च क्षमतेच्या जनरेटरच्या सहाय्याने कारखाने सुरू ठेवावे लागतात. यासाठी डिझेलचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. लहान उद्योजकांना हजारो रुपये तर मोठ्या कोल्डस्टोरेज चालकांना लाखो रूपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. विजेचा लपंडावा कायमस्वरूपी थांबवावा अशी मागणी उद्याेजकांनी महावितरण प्रशासनाकडे केली आहे.
उत्पादनावरही परिणामविजेच्या लपंडावामुळे कोल्ड स्टोरेज चालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. इतर कारखान्यांमधील उत्पादनावरही परिणाम होऊ लागला आहे. विद्यूत पुरवठा खंडीत झाल्यानंतर कामकाज ठप्प होते व मोठे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे विद्यूतपुरवठा सुरळीत होईल यावर लक्ष द्यावी अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.
कोल्डस्टोरेजमधील कृषी माल योग्य तापमानामध्ये ठेवावा लागतो. विजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्यामुळे जनरेटरचा वापर करावा लागतो. यामुळे इंधनावर हजारो रूपयांचा खर्च होत आहे. महावितरण प्रशासनाने विजेचा लपंडाव बंद करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी.- निलिमा गणेश नाईक, संचालिका - जय रिद्दी व्हेंचर