मधुकर ठाकूर
उरण :
जेएनपीए बंदरास या वर्षातील सार्वजनिक-खाजगी गुंतवणुकीस ( पीपीपी) प्रोत्साहन देणारी सर्वाधिक प्रशंसनीय केंद्रीय संस्था म्हणून इकॉनॉमिक टाइम्स इन्फ्रा फोकस अवॉर्ड्स २०२२" पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
मागील २५ वर्षांत देशात बंदर क्षेत्रातील सार्वजनिक-खाजगी गुंतवणुकीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जवाहरलाल नेहरू पोर्टने जुलै १९९७ मध्ये न्हावा-शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी) या खाजगी टर्मिनल सोबत ऐतिहासिक करार केला होता. ज्यामुळे एनएसआईसीटी हे देशातील प्रमुख बंदरांमध्ये पीपीपी तत्त्वावर विकसित केलेले पहिले पोर्ट टर्मिनल ठरले होते. अशा प्रकारचा करार करणारे जेएनपीए हे देशातील पहिले बंदर ठरले होते. जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनर टर्मिनल (जेएनपीसीटी) साठी जेएनपीए आणि जे.एम. बक्शी एण्ड लॉजिस्टिक्स लि.- सीएमए टर्मिनल्स यांच्यात २९ जुलै २०२२ रोजी सवलत करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती.ज्यामुळे जेएनपीए हे भारताचे पहिले १००% लॅडलॉर्ड बंदर बनले आहे.
जेएनपीएच्यावतीने उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ, यांनी पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार वितरण कार्यक्रमात कृतज्ञता व्यक्त करताना उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी जेएनपीएचे सर्व कर्मचारी आणि भागधारकांचे आभार मानले. हा पुरस्कार आमच्या प्रयत्नांना आणि आमच्या भागधारकांना व ग्राहकांसाठी आम्ही देत असलेल्या कार्यक्षम सेवेची पोचपावती आहे.
इकॉनॉमिक टाईम्स इन्फ्रास्ट्रक्चर अवॉर्ड्सचे उद्दिष्ट देशातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणा-या संस्थाना शोधून त्यांना पुरस्कृत करणे आहे. विकासक, केंद्र आणि राज्य संस्था आणि वित्त पुरवठा करणा-या जागतिक दर्जाच्या संस्था ज्या उत्कृष्ट व्यावसायिक कौशल्य, सर्वोत्तम पद्धती, अनुकरणीय दृष्टी आणि पीपीपी प्रकल्पांच्या संकल्पना, विकास आणि अंमलबजावणीमध्ये एकूणच उत्कृष्टतेचे प्रदर्शन करून इतरांसाठी अनुकरणीय बनतात अशा संस्थांना एकत्रित करण्यावर त्यांचा भर आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्यास आकार देणाऱ्या संस्थांच्या प्रयत्नांनाही या पुरस्काराने मान्यता मिळते.
जेएनपीएला अलीकडेच "मेरीटाइम आणि लॉजिस्टिक अवॉर्ड्स २०२२" मध्ये 'वर्षातील सर्वोत्कृष्ट मेजर पोर्ट (कंटेनर)' पुरस्कारानेही सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे.