नवी मुंबई : डाळी, कडधान्यांप्रमाणे खाद्यतेलांच्या किमतीही दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेमध्ये जवळपास ६० टक्के किमती वाढल्या असल्यामुळे सर्वसामान्यांच्या आहारामधून तेलाचा वापरही कमी होऊ लागला आहे. शासनाने पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केल्यामुळे अनेकांना कामावरून घरी बसावे लागले आहे. उत्पन्न कमी झाले असले तरी महागाईमुळे खर्चात मात्र दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मागील काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशातील तेलाची मागणी व उत्पादन यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात करावी लागते. सोयाबीन व सूर्यफूल तेलाची जवळपास १५० लाख टन आयात करावी लागते. परंतु गतवर्षी कोरोना सुरू झाल्यापासून आयात कमी होत असून, त्याचा परिणाम बाजारभाव वाढण्यावर झाला आहे. भारतात अमेरिका, अर्जेंटिना व ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणात आयात होते. तेथील समाधानकारक उत्पन्न नसल्यामुळे त्याचा फटकाही आयातीवर होऊ लागला आहे. गतवर्षी सूर्यफूल तेल ९० ते १०० रुपये किलो दराने विकले जात होते. सद्य:स्थितीमध्ये हेच दर जवळपास १६० रुपये किलो झाले आहेत. करडई १८० ते १९०, शेंगदाणा तेल जवळपास १९० रुपये, पामतेल १४८ रुपये किलो झाले आहे. प्रत्येक तेलाच्या दरामध्ये प्रतिकिलो ६० ते ८० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या आहारातून तेलाचा वापर कमी करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. कोरोनामुळे रोजगार मिळत नाही. उत्पन्नावर परिणाम झाला असून, दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत. तेलाचे दर वाढत असल्यामुळे जेवणातील तेलाचा वापर कमी करावा लागला आहे. - सुजाता शिंदे, तुर्भे
डाळी, कडधान्यानंतर आता तेलाचे दरही गगनाला भिडत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना तेलाचे दर परवडत नसून शासनाने रेशनिंगवर जास्तीत जास्त तेल उपलब्ध करून दिले पाहिजे. - गीता पवार, नेरूळ गतवर्षी दिवाळीपासूनच तेलाचे दर वाढत आहेत. कोरोनाकाळात अत्यावश्यक वस्तूंच्या दरामध्ये वाढ होणार नाही यासाठी शासनाने काळजी घेतली पाहिजे. दरवाढीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. - अश्विनी शेडगे, वाशी
सर्वच तेलांच्या किमती वाढत आहेत. आयात कमी होत असल्यामुळे गतवर्षीपासून दर वाढत आहेत. मागणी व पुरवठ्यामध्ये निर्माण झालेेली तफावत कमी होईपर्यंत दर तेजीतच राहतील. - समीर चव्हाण, दुकानदार तेलाचे वर्षभरातील बाजारभाव प्रकार २०२० २०२१सूर्यफूल ९० ते १०० १४० ते १६० सोयाबीन ८५ ते ९० १४० ते १५०पामतेल ८० ते ८५ १४० ते १४८शेंगतेल ११० ते १२० १८० ते १९०करडई १६० ते १७० १८० ते १९०वाढत्या किमतीमुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.