रवींद्र सोनावळे
शेणवा: मोहाच्या बियांपासून तेल गाळून ते खास खाद्यासाठी वापर करण्याची परंपरा शहापूरच्या आदिवासी समाजाने जपली आहे. या तेलाला आयुर्वेदिक महत्त्व असल्याने मोहाच्या तेलाला प्रचंड मागणी आहे. दरवर्षी तेल गाळण्यासाठी पावसाळ्यात आदिवासींची लगबग असते. तेल गाळण्यासाठी सध्या शहापूरमधील गिरण्यांमध्ये आदिवासींनी एकच गर्दी केली आहे.
तालुक्यातील वासिंद, खर्डी, डोळखांब, किन्हवली, कसारा या दुर्गम भागांत वास्तव्य करणारे आदिवासी उन्हाळ्यात जंगलातून मोठ्या मेहनतीने मोहाची फळे गोळा करून आणतात. नंतर, त्यातील बिया काढून त्या उन्हाळ्यात सुकवतात. एका प्लास्टिकच्या पिशवीत व टोपल्या किंवा डब्यांमध्ये साठवून या बियांपासून खाद्यतेल गाळले जाते. तेलाची आम्ही विक्र ी न करता वर्षभर अन्नपदार्थ बनवण्यासाठी खाद्यतेल म्हणून वापरतो, असे गोदीबाई कुवरे व सीता खांजोडे या महिलांनी सांगितले. सध्या बियांपासून तेल गाळण्यासाठी गिरणीवर आदिवासींची झुंबड उडाली आहे. येथील गिरणीतील तेलाच्या घाण्यावर दिवसभरात रोज ७० ते ८० लीटर तेल गाळले जाते. मोहाच्या बियांनी भरलेला एक डबा तेल गाळण्यासाठी २० रु पये दर आकरला जातो, असे गिरणी कामगार रवींद्र हरड यांनी सांगितले. आॅगस्टअखेर अशीच गर्दी राहणार असल्याचे ते म्हणाले.गरीब आदिवासींकडे तेल गाळण्यासाठी पैसे असो वा नसो, एखाद्याची पैशांची चणचण असली, तरी त्या आदिवासींना माघारी न पाठवता त्यास मदत म्हणून विनामूल्य तेल गिरणीत गाळून दिले जाते.- नामदेव देसले, कामगार