संपादित जमिनीची सातबाऱ्यावर नोंद

By admin | Published: May 2, 2016 02:20 AM2016-05-02T02:20:05+5:302016-05-02T02:20:05+5:30

नवी मुंबईतील संपूर्ण जमिनीची मालकी सिडकोकडे आहे. या मालकी हक्काला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी संपादित केलेल्या सर्व जमिनीच्या सातबाऱ्यावर सिडकोने आपल्या

Edited land record seven times | संपादित जमिनीची सातबाऱ्यावर नोंद

संपादित जमिनीची सातबाऱ्यावर नोंद

Next

- कमलाकर कांबळे,  नवी मुंबई
नवी मुंबईतील संपूर्ण जमिनीची मालकी सिडकोकडे आहे. या मालकी हक्काला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी संपादित केलेल्या सर्व जमिनीच्या सातबाऱ्यावर सिडकोने आपल्या नावाची नोंद केली आहे. त्यानुसार जवळपास १५ हजार हेक्टर जागेच्या मालकी हक्कावर सिडकोची अधिकृत मोहर लागली आहे.
नवी मुंबईची उभारणी करण्यासाठी राज्य शासनाने सिडको महामंडळाची स्थापना केली. त्यानुसार सिडकोने ठाणे, पनवेल आणि उरण तालुक्यातील ३४३.७ चौरस किलोमीटरचा भूभाग संपादित केला. शासकीय धोरणानुसार सिडकोने मूळ जमीन मालकाला संपादित केलेल्या जमिनीचा मोबदलाही दिला आहे. त्यानुसार संपादित केलेल्या सर्व जमिनीचा मालकी हक्क सिडकोला प्राप्त झाला आहे. असे असले तरी या मालकी हक्काला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी संपादित जमिनीच्या सातबाऱ्यावर सिडकोचे नाव येणे गरजेचे होते. मात्र मागील चाळीस वर्षांत सिडकोकडून या दृष्टीने कोणतेही प्रयत्न झाले नाहीत.
सिडकोने खासगी शेतीच्या १५ हजार हेक्टरसह वन आणि शासकीय मालकीच्या जमिनी संपादित केल्या आहेत. वन आणि शासकीय जमिनीच्या सातबाऱ्यांवर सिडकोचे नाव पडले आहे. परंतु शेतकऱ्यांकडून संपादित केलेल्या जागेच्या सातबाऱ्यांवर मात्र आतापर्यंत मूळ मालकाचेच नाव होते. या पार्श्वभूमीवर संपादित केलेल्या जवळपास १५ हजार हेक्टर जागेच्या सातबाऱ्यावर सिडकोचे नाव टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दोन वर्षांपूर्वी सिडकोने घेतला होता. सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी यासंदर्भात आग्रही भूमिका घेतली होती.
त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली होती. सध्या हे काम पूर्ण झाले असून तब्बल १५ हजार हेक्टर जागेच्या सातबाऱ्यावर आता सिडकोचे नाव कोरले गेले आहे. विशेष म्हणजे या मोहिमेसाठी सिडकोने संपादित जमिनीची ताबा पावती, जुने सातबारा त्याचे फेरफार आदी महत्त्वाच्या हजारो कागदपत्रांचे स्कॅनिंग केले. तसेच संपूर्ण जमिनीचे नकाशे अपडेट करण्यात आल्याची माहिती सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी ‘लोकमत’ला दिली.
जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या दस्ताऐवजावरून संपादीत व असंपादीत जमिनीचे वर्गिकरण करण्यात आले आहे. त्यावरून सिडकोकडे आणखी मोठ्या प्रमाणात जमीन शिल्लक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या जमिनीचे योग्य पध्दतीने नियोजन व्हावे, या दृष्टीने लॅण्ड बँकेची निर्मिती करण्यात आल्याचे व्ही.राधा यांनी सांगितले.

विमानतळाची जमीनही सातबाऱ्यावर
एकूणच २ हजार ६८ हेक्टर जमिनीवर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प उभारला जाणार आहे.
यापैकी जवळपास ९४ टक्के जमीन सिडकोच्या ताब्यात आहे, तर उर्वरित ६ टक्के म्हणजेच ७६१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे.
या संपादित जमिनीचा सातबाराही सिडकोने आपल्या नावावर करून घेतला आहे. तसेच विमानतळबाधितांसाठी प्रस्तावित पुष्पकनगरमध्ये वाटप करण्यात आलेली जमिनीची नोंदही सातबाऱ्यावर करण्यात आली आहे.
साडेबारा टक्के योजनेअंतर्गत वाटप होणारी जमीनसुध्दा सातबाऱ्यावर घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

Web Title: Edited land record seven times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.