अरूणकुमार मेहत्रे/ लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : पनवेल महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त तरुण चेहरे उतरविण्यात आले आहेत. त्यामुळे या महापालिकेत पहिल्यांदाच त्या त्या प्रभागाचे यंगस्टर नेतृत्व करणार आहेत. त्यातही उच्चशिक्षित नावांवर बऱ्याच ठिकाणी शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, वकील आणि डॉक्टरांची संख्या बऱ्यापैकी आहे. इंजिनीअरही निवडणूक रिंगणात उतरले आहेत.महापालिका क्षेत्रात नागरी वसाहती जास्त प्रमाणात आहेत त्या ठिकाणी चाळीच्या आतमधील मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्याचबरोबर सुशिक्षित मध्यमवर्गीयही बऱ्यापैकी आहेत. त्यामुळे त्यांचे प्रतिनिधित्व करणारेसुद्धा तरुण व उच्चशिक्षित असावेत, अशी अपेक्षा केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी शोध मोहीम आगोदरच सुरू केली होती. तरुण आणि सुशिक्षित उमेदवाराला अधिक प्राधान्य देण्याचा प्रयत्न प्रमुख राजकीय पक्षांमधून करण्यात आल्याचे दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक-१७ मध्ये २० वर्षे नगरसेवक राहिलेले संदीप पाटील नेतृत्व करीत आहेत. ते इलेक्ट्रिकल इंजिनीअर आहेत. त्यांच्या पॅनेलमधून राष्ट्रवादीच्या शिवानी सुनील घरत यांना उमेदवारी देण्यात आली आहे . सुनील घरत यांची कन्या असलेल्या शिवानी हिने बीएमएस केले आहे. याच प्रभागातून संदीप पाटील यांच्याविरोधात अॅड. मनोज भुजबळ यांना भाजपाने तिकीट दिले आहे. भुजबळ पनवेल तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. तसेच पक्षाने शेवटच्या क्षणी अॅड. वृषाली जितेंद्र वाघमारे यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. व्यवसायाने वकील असलेल्या वृषाली यांच्यामुळे पॅनलला ताकद मिळाली आहे. प्रभाग क्रमांक-१६मधून भारतीय जनता पक्षाकडून डॉक्टर असलेल्या डॉ. कविता किशोर चौतमोल यांनी उमेदवारी दिली आहे. प्रभाग क्र मांक -१६मध्ये काँग्रेसकडून श्याम म्हात्रे यांची कन्या श्रृती म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या व्यवसायाने वास्तुविशारद आहेत येथूनच शिवसेनेने अॅड. शुभांगी शेलार यांना संधी देण्यात आली आहे. याच ठिकाणी सर्वसाधारण गटातून मनसेचे अॅड. संतोष सरगर निवडणूक लढवीत आहेत. शिवसेनेचे शहरप्रमुख अॅड. प्रथमेश सोमण यांनी प्रभाग क्र मांक १८मधून उमेदवारी अर्ज भरला आहे. शेकापच्या वतीने डॉ. सुरेखा मोहकर यांना तिकिट देण्यात आले आहे. प्रभाग आठ मधून रोडपाली कळंबोली विकास आघाडीतून संधी देण्यात आलेले रोहन पाटील इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे. याच आघाडीच्या वतीने प्रभाग सातमध्ये रेवती बैजू या तरुणीला उमेदवारी देण्यात आली आहे. रेवती अॅडव्हरटायझिंग अॅण्ड पब्लिक रिलेशनचे पदवीत्तर शिक्षण घेत आहेत. सायबर सिटीत ३२ वर्षांच्या नेत्रा किरण पाटील या सुशिक्षित आणि तरुण उमेदवार म्हणून परिचित आहेत. पाटील यांना बँकिंग क्षेत्रातला दांडगा अनुभव आहे. कामोठे वसाहतीतील प्रभाग-१३मधून डॉक्टर अरुणकुमार भगत यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे. प्रभाग क्रमांक ११मधून डॉक्टर अनिकेत अवारे यांच्या मातोश्री सुनंदा अवारे यांना शिवसेनेकडून तिकीट मिळाले आहे. सुनंदा अवारे याही पदवीधर आहेत. प्रभाग-१९मधून मनसेकडून अॅड. केदार सोमण निवडणूक लढवत आहेत.
महापालिकेच्या रणांगणात सुशिक्षित चेहरे
By admin | Published: May 08, 2017 6:34 AM