मधुकर ठाकूर
उरण : शिक्षणा एवढेच आपल्या सुप्त गुणांना महत्त्व द्या, या सुप्तगुणातच मुलांचे करिअर दडलेले असते असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त तथा सिडकोचे मुख्यदक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी उरण येथे केले. चिरनेर येथील पी. पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या विद्या संकुलनाचे वार्षिक स्नेहसंमेलन गुरुवारी २८ डिसेंबर रोजी पार पडले. याप्रसंगी ते आपल्या उद्घाटनपर भाषणात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम, व्यवस्थापकीय संचालक पी. पी. खारपाटील, सनदी लेखापाल एकनाथ पाटील, भवानी शिपिंग इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर के. एन. शेट्टी, सामाजिक कार्यकर्ते परिक्षित ठाकूर, पोलीस पाटील संजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते परशुराम पाटील चार्टर्ड अकाउंट संजय भुजबळ, विद्या संकुलनाच्या सुनिता खारपाटील, चिरनेर ग्रामपंचायतीच्या सद्स्या वनिता गोंधळी, पत्रकार दत्तात्रेय म्हात्रे, मुख्याध्यापक सुरदास राऊत, प्रशासकीय अधिकारी व्ही. ए. पाटील, मुख्याध्यापिका सुप्रिया म्हात्रे, मुख्याध्यापिका मंदा घरत, कार्याध्यक्ष प्रकाश म्हात्रे ,उपकार्याध्यक्षा स्मिता मसुरकर, पर्यवेक्षक आनंद चिर्लेकर आदी मान्यवरांबरोबरच विद्यार्थी प्रतिनिधी आदित्य केणी, जान्हवी नाईक, संजना केणी, विघ्नेश पाटील, प्रिया मेस्त्री, हर्ष ठाकूर विद्यार्थी उपस्थित होते.
यापुढे बोलताना पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी आयुष्यात विद्यार्थ्यांनी आपले ध्येय लक्षात घेऊन मार्ग निवडला पाहिजे. आपल्याला ज्या क्षेत्रात गोडी आहे असेच क्षेत्र आपण निवडा आणि यातून आपले करिअर घडवा. भाषेवर प्रेम करायला शिका. मराठी भाषा फार सुंदर आहे. अभ्यासाला महत्त्व द्या, अभ्यासात देव शोधा. तो दिसेल. जगात अवघड असं कोणतेही काम नाही. ते श्रद्धेने केले तर ते सोपं होते. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना प्रश्न विचारून भंडावून सोडलं पाहिजे तरच या ठिकाणी विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा कस लागतो. आणि जीवनात विद्यार्थी यशस्वी होतात. आयुष्यात एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचा. ही काळाची गरज आहे .असे सांगून सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम असून, या माध्यमाचा योग्य तोच वापर करा. असे आवाहन करून, शाळा महाविद्यालयातील मुलांमध्ये तत्सम चित्रकरणाच्या प्रभावामुळे विकृत दृष्टिकोन निर्माण होतो. आणि त्यातून अत्याचार हिंसेच्या घटना घडू शकतात. अशा चित्रीकरणाच्या मजकुरावर आणि वेबसाईटवर प्रतिबंध घालण्याचे आवाहन करतानाच सायबर गुन्हेगारीवर वचक ठेवता आला पाहिजे. मुलांमध्ये अशा कार्यक्रमातून याबाबत प्रबोधन करण्याची गरज असल्याचेही मेंगडे यांनी यावेळी केले. तर उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.मुलांनो आयुष्य खूप मोलाचे आहे. त्यामुळे ते चांगल्या पद्धतीने जगता आले पाहिजे, सध्या तुमचे शालेय जीवन आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यासाला महत्त्व दिले पाहिजे. यासाठी मोबाईलचा वापर टाळला पाहिजे. सारासार विचार केला तर मुली या मन लावून अभ्यास करतात. त्यामुळे परीक्षांच्या निकालात मुलींचीच बाजी पहायला मिळते. विशेषता महिला या सर्व क्षेत्रात पुढे आहेत. मुलांनीही आपली ध्येय ठरविली पाहिजेत. एकंदरीत विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या विश्वातून बाहेर पडले पाहिजे. पूर्वी लहानपणापासून व्यायामाचे धडे शिकविले जात असत. त्यातून निरोगी आयुष्य जगता येत होते. परंतु आज ती परिस्थिती राहिली नाही. तरुण पिढी मोबाईलच्या आहारी गेली असून, ते अत्यंत धोकादायक आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या विश्वातून बाहेर पडून फिटनेस साधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, असे आवाहन निकम यांनी आपल्या भाषणातून केले. प्रारंभी व्यवस्थापकीय संचालक पी. पी. खारपटील, समीर खारपाटील, सागर खारपाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मुख्याध्यापक सुरदास राऊत यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विजय पवार यांनी केले. आभार कार्याध्यक्ष प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केले.