रायगडमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:15 AM2020-01-11T00:15:55+5:302020-01-11T00:16:00+5:30

रायगड जिल्ह्यात शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत.

Education playground in Raigad | रायगडमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा

रायगडमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा

googlenewsNext

अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : रायगड जिल्ह्यात शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. ६० टक्के जागेवर अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे, त्यामुळे सर्व शिक्षा अभियानाबरोबरच अनेक गोष्टींना अडचणी येत आहेत. शासन याविषयी फारसे गंभीर दिसत नाही. फक्त वेळकाढू धोरण ते अवलंबित असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. नवीन सरकारकडून याबाबत ठोस निर्णय घेण्यात येतील, अशी आशा शिक्षण विभागाला वाटत आहे.
रायगड जिल्ह्यात एकूण १५ तालुके असून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हजारो शाळा सुरू आहेत. येथे लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत; परंतु पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात वानवा आहे.
वीजबिल भरण्याकरिता शाळेकडे पैसे नाहीत, तसेच अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत. कित्येक ठिकाणी विद्यार्थिनींना शौचालयाची व्यवस्था नाही, अशी खूप म्हणजे खूप भयानक परिस्थिती आहे. त्यातच रायगडचा शिक्षण विभाग दुबळा असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा शिक्षण विभागात अनेक पदे रिक्त आहेत. उपलब्ध असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हा भार मोठ्या प्रमाणात आहे.
५० टक्केसुद्धा पदे रायगड जिल्हा शिक्षण विभागात भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे अनेकांवर अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे दर्जेदार शिक्षण देण्यात अनेक अडचणी येऊन राहिल्या आहेत. याविषयी वारंवार पाठपुरावा करूनही शिक्षण विभागाकडून कोणताही निर्णय घेण्यात येत नाही.
त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शिक्षणाचा एक प्रकारे फज्जा उडाला आहे.
>शिक्षणेतर कामांचा भार
रायगड जिल्ह्यात शिक्षण विभागात मनुष्यबळाची कमतरता आहे. हे असताना उपलब्ध शिक्षक तसेच इतरांना मतदार याद्या, मतदान, जन्म-मृत्यू नोंदणी, जनगणना यासारखी शिक्षणेतर अनेक कामे दिली जातात. त्यामुळे जिल्ह्याच्या शिक्षणाच्या दर्जावर त्याचा परिणाम निश्चित होत आहे.
>जिल्ह्यात फक्त एकच गटशिक्षणाधिकारी
रायगडमध्ये एकूण १५ तालुके आहेत, त्यामध्ये महाड वगळता इतर १४ गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे मोकळी आहेत. पनवेल सर्वाधिक मोठा तालुका आहे. येथे महानगरपालिका आहे, तसेच शिक्षणाचे हब येथे तयार झाले आहे. अनेक खासगी शिक्षण संस्थाही आहेत; परंतु येथे एकच विस्ताराधिकारी आहे. त्यांच्यावर गटशिक्षण अधिकाºयाची जबाबदारी आहे. इतर अधिकारी नाहीत, त्यामुळे शाळा, पालक तसेच विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात. या ठिकाणी शिक्षणाचा दर्जा तसेच शुल्कवाढ आणि इतर गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याकरिता मनुष्यबळ नाही. नवनाथ साबळे यांच्याकडे सर्व पदांचा पदभार आहे. ते पनवेलमध्ये एकटेच अधिकारी असल्याने अनेक अडचणी येत आहेत. त्यांना खूप काम असल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत आहे. विशेष म्हणजे, प्राथमिक विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारीचे पद रिक्त आहे. त्याचा अतिरिक्त पदभार महिला व बाल कल्याण विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला आहे.
>राजिप शाळांमध्ये साडेपाच लाख विद्यार्थी
जिल्ह्यात १५ तालुक्यांमध्ये ३,८१० शाळा आहेत. त्यामध्ये पाच लाख ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इतकी मोठी संख्या असताना जिल्हा शिक्षण विभागात अनेक पदे रिक्त आहेत. यावरून शासन शिक्षणाबाबत किती गंभीर आहे हे दिसून येत आहे.
२५ शाळांना मुख्याध्यापकच नाही
१०० पेक्षा जास्त पटसंख्या असणाºया शाळांना मुख्याध्यापक नेमला जातो. रायगड जिल्ह्यात इतकी पटसंख्या असतानाही २५ शाळांना मुख्याध्यापक नसल्याचे उघड झाले आहे, त्यामुळे त्या शाळेच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. निवृत्त झालेल्या मुख्याध्यापकांच्या जागेवर इतरांची नियुक्ती झालेली नाही.
>शिक्षण विभागातील रिक्त जागा भराव्यात, याकरिता आम्ही सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत आहोत; परंतु आमच्या न्याय्य मागणीला दाद दिली जात नाही. त्याचा परिणाम गुणवत्तेवर होत आहे. तसेच जे उपलब्ध मनुष्यबळ आहे त्यांना वेगळ्या कामासाठी जुंपले जात आहे. त्यामुळे ज्ञानदान करणाºया तसेच त्यासाठी काम करीत असलेल्यांवर अतिरिक्त भार येत आहे.
- सुभाष भोपी,
पनवेल तालुका अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ
>जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागातील रिक्त पदे
पदनाम मंजूर पदे कार्यरत रिक्तपदे
शिक्षण अधिकारी ०१ - ०१
उपशिक्षण अधिकारी ०३ - ०३
गटशिक्षण अधिकारी १५ ०१ १४
विस्तार अधिकारी ६२ १९ ४३
शालेय पोषण आहार अधीक्षक १५ ०२ १३
कें द्रप्रमुख २२८ १३२ ९६
मुख्याध्यापक १४९ १२४ २५
एकूण ४७३ २७८ १९५

Web Title: Education playground in Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.