नवी मुंबई : निकालाच्या रखडपट्टीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाºया विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. परदेशातील युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळाला असून पैसे देखील भरले गेले आहेत, मात्र निकाल हाती नसल्याने मायदेशी परतावे लागते की काय अशी चिंता विद्यार्थी आणि पालकांकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पैशांची जमवाजमव, विदेशात शिक्षणासाठी जाण्याची तयारी करूनही निकालाच्या प्रतीक्षेत विद्यार्थ्यांची झोप उडाली आहे.इतर शाखांच्या तुलनेने पदव्युत्तर शिक्षणासाठी अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थी जास्त असून निकाल न लागल्याने करिअर धोक्यात आले आहे.शेवटच्या वर्षाचे निकाल हे विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणारे निकाल असतात. त्यामुळे त्या निकालांमध्ये झालेला घोळ हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या भविष्याशी होणारा खेळच आहे. रखडलेल्या निकालांमुळे विद्यार्थ्यांचे पुढच्या शिक्षणाचे मार्ग मोकळे होऊ शकत नाही. मुंबई विद्यापीठ या सर्व गोष्टींमध्ये अगदी हलगर्जीपणा दाखवत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. अनागोंदी कारभारामुळे गेली तीन ते चार वर्षे अभ्यास करून पदवीची परीक्षा देणारे विद्यार्थी मोठ्या मानसिक तणावातून जात असून विद्यार्थ्यांचा ताण आणखी वाढल्याने पालकांनी असंतोष व्यक्त केला आहे. पेपर तपासणीत व निकालांच्या बाबतीत होणारे गोंधळ थांबवण्यासाठी विद्यापीठाने एक व्यवस्थित अशी यंत्रणा राबवली पाहिजे. नवी मुंबईतील महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांनी विदेशात उच्च शिक्षणासाठी अर्ज केले असूनही निकाल वेळेत न लागल्याने पैसे भरुनही वर्ष वाया जाणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील जवळपास ४० विद्यार्थी परदेशी गेले आहेत यामध्ये यूएसमधील युनिव्हर्सिटी आॅफ टेक्सास येथे एमएसकरिता गेलेल्या विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी शाखेच्या शेवटच्या वर्षाचा निकाल हाती न आल्याने युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश दिला जात नसल्याची माहिती ‘लोकमत’ला दिली. निकालाला आणखी विलंब झाल्यास मात्र पुन्हा मायदेशी परतावे लागेल यांची नाराजी या विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. लवकरात लवकर निकाल लावून विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी विद्यापीठाने घ्यावी अशी मागणी यावेळी केली आहे.>भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव विनायक पिसाळ यांनी या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली असून प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भेट घेऊन विद्यार्थ्यांची प्रश्न मांडणार आहेत. यावेळी बोलताना विद्यापीठाचे खासगीकरण करणे आवश्यक असून त्याशिवाय गैरव्यवहार थांबणार नाहीत असेही पिसाळ यांनी स्पष्ट केले. परदेशी गेलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या नामुष्कीमुळे मायदेशी परतावे लागू नये, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. किमान गोपनीय कागदपत्रे पाठवून विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येणार नाही याची खबरदारी घेण्याची मागणी पिसाळ यांनी केली.
परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 3:26 AM