ई-रूपी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, महापालिका प्रशासनाचा निर्णय
By योगेश पिंगळे | Published: June 22, 2023 11:45 AM2023-06-22T11:45:15+5:302023-06-22T11:45:27+5:30
नवी मुंबई शहरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनादेखील दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून शाळांच्या प्रशस्त इमारती उभारून मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, सीबीएसई आदी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या आहेत.
- योगेश पिंगळे
नवी मुंबई : आपल्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेशासहित इतर शैक्षणिक साहित्य महापालिका पुरविते. मात्र, यासाठीच्या डीबीटी धोरणाला पालकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने यंदाच्या वर्षांपासून ई-रूपी प्रणाली राबविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुषंगाने अंमलबजावणीला सुरुवात केली असून, सर्व विद्यार्थ्यांना गणवेश तसेच इतर शैक्षणिक साहित्य लवकरच उपलब्ध होणार आहे.
नवी मुंबई शहरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनादेखील दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून शाळांच्या प्रशस्त इमारती उभारून मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, सीबीएसई आदी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या आहेत. या शाळांत शिक्षण घेणाऱ्या बालवाडी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्यदेखील पुरविले जाते.
डीबीटी धोरण राबविण्याचे आदेश शासनाने दिल्यावर शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून पालिकेने त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात केली होती. मात्र अल्प प्रतिसाद मिळत असल्याने यंदा ई-रूपी प्रणाली राबविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी विद्यार्थ्यांचा डेटा आणि विभागानुसार पुरवठादार यावर काम सुरू आहे. ई-रूपी प्रणालीमुळे गणवेश तसेच शैक्षणिक साहित्य मिळणे सुलभ होणार असून यासाठी पालकांना कोणताही आगाऊ खर्च करण्याची आवश्यकता नाही.
अॅण्ड्राॅइड मोबाइलची आवश्यकता नाही
बँकेच्या माध्यमातून पाठविण्यात येणाऱ्या लिंकच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी पालकांकडे अॅण्ड्राॅइड मोबाइल असणे आवश्यक नाही. सध्या मोबाइल फोनवरदेखील लिंक प्राप्त होणार असून त्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य घेता येणार आहे.
काय आहे ई-रूपी प्रणाली?
महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची मोबाइल नंबरसह सर्व माहिती अपडेट केली जात आहे. आयसीआयसीआय बँकेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाइलवर वेगवेगळ्या ३ लिंक पाठविण्यात येणार आहेत. सदर लिंक पालकांनी गणवेश आणि साहित्य पुरवठा करणाऱ्या दुकानदाराला दाखवायच्या असून दुकानदार त्या लिंकमधील क्यूआरकोड स्कॅन करणार आहे. त्या माध्यमातून पैसे प्राप्त होणार असून शैक्षणिक साहित्य उपलब्ध होणार आहे.
डीबीटी प्रणालीमध्ये तंत्राची अडचणी आणि विलंब होत असल्याने पालकदेखील उत्सुक नव्हते. त्यावर तोडगा म्हणून ई-रूपी प्रणाली आणली आहे. यामुळे महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळणे सोपे झाले असून, नक्कीच लवकरच सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
- राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका