पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:56 AM2019-06-18T00:56:19+5:302019-06-18T00:56:27+5:30
शिक्षकांसह लोकप्रतिनिधींनीही केले विद्यार्थ्यांचे स्वागत
नवी मुंबई/पनवेल : नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरामधील शाळांचा परिसर सोमवारी गजबजला होता. विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आलेल्या पालकांमुळे शाळांच्या प्रवेशद्वारावरही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत होते. पहिल्याच दिवशी शालेय साहित्याचे वाटप केल्यामुळे व शिक्षकांनी स्वागत केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
विद्यार्थ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस उत्साहाचा होता. पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद, पनवेल महापालिकेसह खासगी शाळेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवसाचे औचित्य साधून जल्लोषात स्वागत करण्यात आले. विविध शाळांमध्ये यावेळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पनवेल महापालिकेच्या श्री गणेश विद्यामंदिर शाळा धाकटा खांदा याठिकाणी पालिकेच्या माध्यमातून स्वागताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला आयुक्त गणेश देशमुख, महापौर कविता चौतमोल उपस्थित होत्या. आयुक्तांनी स्वत: विद्यार्थ्यांच्या हाताला धरून शाळेत स्वागत केले.
शेकडो विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे यावेळी उपस्थित होते. खारघर शहरातील कोपरा
गावातील ग्रामविकास मंडळाच्या शाळेत देखील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये देखील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके देण्यात आली. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
मनपा शाळेतही उत्साह
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्येही विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. रबाळे येथील शाळेमध्ये माजी महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासह मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले. इंदिरानगरमध्ये महेश कोठीवाले व इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. शाळा क्रमांक २८ मध्ये शाळा समिती सदस्य जनार्दन मोरे, मुख्याध्यापक नंदकुमार पाटील व इतरांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.