शैक्षणिकदृष्ट्या मुरुड तालुका शंभर टक्के प्रगत
By admin | Published: March 28, 2017 05:23 AM2017-03-28T05:23:19+5:302017-03-28T05:23:19+5:30
संपूर्ण राज्यभर ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ हे अभियान राबवले जात असताना रायगड जिल्ह्यातील
आगरदांडा/ नांदगाव/ मुरुड : संपूर्ण राज्यभर ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ हे अभियान राबवले जात असताना रायगड जिल्ह्यातील निसर्गसंपन्न आणि राष्ट्रीय ऐक्यात अग्रेसर असलेला मुरुड तालुका शैक्षणिकदृष्ट्या शंभर टक्के प्रगत झाल्याचे डी.आय.ई.सी.पी.डी. चे प्राचार्य डॉ. गजानन पाटील यांनी अनौपचारीकरीत्या जाहीर केले. यासाठी त्यांनी तालुक्यातील शंभरहून अधिक शाळांना आपल्या पर्यवेक्षकीय यंत्रणेला सोबत घेऊन प्रत्यक्ष भेटी दिल्या. शाळा-शाळांमध्ये किमान अध्यपन क्षमतेपेक्षाही अधिक सक्षम मुले पाहून समाधान व्यक्त केले. तालुक्यातील सर्व शिक्षकांचे स्फूर्तिस्थान असलेले गटशिक्षणाधिकारी तथा रायगड जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी सुनील गवळी यांचे या वेळी विशेष अभिनंदन केले. यासाठी शाळा-शाळांमध्ये काम करणारे शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रांतर्गत तालुक्यातील सर्वच शाळांमध्ये शैक्षणिक दर्जा उंचावून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास साधला जात आहे. मुरु ड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी म्हणून अधिभार घेतल्यानंतर लगेचच सुनील गवळी यांनी तालुक्यातील शिक्षकांचे वर्कशॉप आयोजित केले होते. २२ मार्च २०१७ रोजी तालुक्यातील सर्व शाळांचे संपूर्णत: त्रयस्थ व्यक्ती आणि मूल्यमापन साधनांच्या साहाय्याने परीक्षण केले. (वार्ताहर)