विमानतळ भरावाचा परिणाम तापमानावर; पनवेल पालिकेच्या महासभेत विविध मुद्द्यांवर चर्चा व सादरीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 11:44 PM2019-08-19T23:44:34+5:302019-08-19T23:44:46+5:30
पनवेल : पनवेल शहरालगत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात भराव करण्यात आला आहे. ...
पनवेल : पनवेल शहरालगत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात भराव करण्यात आला आहे. या भरावाचा परिणाम पनवेल परिसरातील तापमानावर मोठ्या प्रमाणात होणार आहे. पनवेल महापालिकेचा पर्यावरण अहवाल सोमवारी महासभेत सादर करण्यात आला. या अहवालात पालिका क्षेत्रातील हवामान, प्रदूषण, रस्ते, स्वच्छ पाण्याची पातळी यासारख्या विविध मुद्द्यांवर सविस्तर सादरीकरण करण्यात आले.
मुंबई विद्यापीठाला पनवेल महापालिकेच्या पर्यावरण अहवालाचे काम देण्यात आले होते. तीन वर्षांनंतर हा अहवाल मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्थेचे प्राध्यापक एस. के. काठे यांच्याकडून सादर करण्यात आला. अहवालात महापालिका क्षेत्रातील रस्ते, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, नद्यांची अवस्था, प्रदूषण या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार विमानतळासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे मोठ्या प्रमाणात खारफुटीची कत्तल करण्यात आली आहे. खारफुटी वातावरणातील कार्बन शोषून घेण्याचे महत्त्वाचे काम करते. मात्र सद्यस्थितीत कार्बनचे प्रमाण वाढले असून आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे. भविष्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होणार असून विमानतळ परिसरातील तापमान वाढण्याची शक्यता आहे.
पनवेल शहरासह पालिका हद्दीत विविध ठिकाणी उद्भवलेल्या पूरसदृश स्थितीवर महासभेत चर्चा झाली. पालिका हद्दीतील पनवेल शहरासह पूरसदृश निर्माण झालेल्या एकूण ४७ ठिकाणी विविध उपाययोजना राबविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. शहरात उद्भवलेल्या पूरसदृश स्थितीवर अभ्यास करण्यासाठी आयआयटीसारख्या संस्थेची नेमणूक करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केली. विमानतळाच्या भरावामुळे पनवेलमध्ये पूरसदृश स्थिती उद्भवल्याचे परेश ठाकूर यांनी सभागृहात सांगितले.
पर्यावरण अहवाल परिपूर्ण नसल्याचे मत यावेळी शेकापचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी व्यक्त करून कळंबोली, पनवेलमधील समुद्रसपाटीपासून खाली असलेल्या भागांचा यात समावेश करण्याची सूचना त्यांनी केली. महासभेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
महापालिका हद्दीतील जिल्हा परिषदेच्या धोकादायक शाळांचा मुद्दा नगरसेवक हरेश केणी यांनी उपस्थित केला. धोकादायक स्थितीत उभ्या असलेल्या शाळांमध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यावेळी दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी आयुक्त गणेश देशमुख यांनी संबंधित शाळा जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असल्याने त्यांनी याबाबत पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे उत्तर दिले.
महापालिका हद्दीतील ४२ खतकुंड्यापैकी १८ मोडकळीस आल्याचे नगरसेविका सारिका भगत यांनी निदर्शनास आणून दिले. या खतकुंड्याच्या माध्यमातून निर्माण झालेला १० टन खताचा काहीही वापर झालेला नाही. याबाबत त्यांनी नाराजीही व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी घेण्यात आलेली ही शेवटची महासभा आहे. यावेळी काही ठराव स्थगित करण्यात आले असून विशेष सभेत त्यावर चर्चा होणार आहे.
ट्रॅफिक वार्डनची नियुक्ती
पनवेल शहरामध्ये वाहतूकीच समस्या कायम उद्भवत असून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक वार्डन नियुक्त करण्याच्या ठरावाला महासभेत मंजुरी देण्यात आली. तसेच पनवेल महानगर पालिकेच्या व्यायामशाळा भाडेत्तत्वावर देण्यासाठी निविदा मागविण्याचा ठरावालाही सोमवारी झालेल्या महासभेत मंजुरी देण्यात आली.
पालिका हद्दीत प्लॅस्टिक विक्री सुरूच
पनवेल महापालिका हद्दीत अद्याप मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक विक्री होत आहे. याबाबत कडक कारवाई करण्याची मागणी नगरसेविका मुग्धा लोंढे यांनी केली. आयुक्त गणेश देशमुख यांनी याबाबत कडक पावले उचलले जातील, असे आश्वासन यावेळी दिले.