प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 01:07 AM2019-08-09T01:07:19+5:302019-08-09T01:07:37+5:30
शहरात ४०हजार कुटुंबीयांना लाभ मिळणार : ई-कार्डसाठीही पालिका पाठपुरावा करणार
नवी मुंबई : प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा महापालिका क्षेत्रातील ४0,३६३ कुटुंबांना लाभ होणार आहे. योजनेत सहभागी होणाऱ्यांना प्रतिकुटुंब ५ लाखापर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण प्राप्त होणार असून योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राज्यात २३ सप्टेंबर २0१८ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सामाजिक, आर्थिक व जातीय जनगणनेमधील कचरावेचक, घरकाम करणारे, फेरीवाले, बांधकाम मजूर, कारागीर अशा ११ वर्गातील एकूण ८३.७२ लाख कुटुंबांचा समावेश आहे. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ४0,३६३ कुटुंबांचा समावेश असून १,७२,३९३ इतके लाभार्थी या योजनेकरिता पात्र आहेत. लाभार्थी कुटुंबांना प्रतिवर्ष ५ लाखपर्यंत विमा संरक्षण लाभणार आहे. यामध्ये सर्जिकल व मेडिकल उपचार मान्यताप्राप्त खासगी व शासकीय रुग्णालयामार्फत उपलब्ध होणार आहेत. योजनेमध्ये लाभार्थ्यांचा पाठपुरावा करून ई-कार्ड देण्याकरिता महापालिकेमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी व आपले सरकार धारक यांची समन्वय सभा मुख्यालयात उपआयुक्त अमोल यादव यांच्या उपस्थितीत पार पाडली.
सभेमध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब सोनावणे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके, अपघात वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण, समन्वय राज्य हमी सोसायटी प्रवीण मोटे, जिल्हा व्यवस्थापक ठाणे अमोल निमसे उपस्थित होते. या मोहिमेमध्ये नागरी प्रा. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व सिटीजन सर्व्हिस सेंटर यांनी एकत्रितपणे जबाबदारी स्वीकारून लाभार्थ्यांना ई-कार्ड मिळेपर्यंत पाठपुरावा करावा, मोहीम १00 टक्के यशस्वीपणे राबविण्याचे निर्देश उपआयुक्त अमोल यादव यांनी दिले.