नवी मुंबई : नवी मुंबई शहराचे सुरक्षा कवच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या होल्डिंग पाँडमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला असून, होल्डिंग पाँडची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी झाली आहे. पावसाळ्यात भरतीच्या वेळी शहराच्या काही भागांत पाणी साचण्याच्या घटनाही घडत आहेत. या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शनिवारी, ७ नोव्हेंबर रोजी शहरातील होल्डिंग पाँडची पाहणी केली. गाळ काढून होल्डिंग पाँडची क्षमता वाढविणे, तसेच होल्डिंग पाँडमध्ये वाढलेले कांदळवन याबाबत मार्ग काढण्यासाठी प्रस्ताव बनवून संबंधित विभागांना सादर करण्याचे निर्देश आयुक्त बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले.
नवी मुंबई शहराला सुरक्षा प्रदान करणाऱ्या होल्डिंग पाँड या अत्यंत महत्त्वाच्या व बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या विषयाकडे लक्ष देत महापालिका आयुक्त बांगर यांनी शहर अभियंता सुरेंद्र पाटील आदी अधिकारी यांच्यासमवेत सीबीडी बेलापूर सेक्टर १२, वाशी सेक्टर ८, वाशी येथील होल्डिंग पाँडचा पाहणी दौरा केला. पाहणीदरम्यान गाळ काढून होल्डिंग पाँडची क्षमता वाढविणे, तसेच होल्डिंग पाँडमध्ये वाढलेले कांदळवन याबाबत मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथोरिटी आणि वन विभागाचा मॅनग्रुव्हज सेल यांच्या परवानगीसाठी तत्परतेने प्रस्ताव बनवून सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
पावसाळ्यात भरतीच्या कालावधीत होल्डिंग पाँडमधील अतिरिक्त पाणी पम्पिंग करण्यासाठी असलेल्या पंप हाऊसच्या इमारती तीस वर्षांहून अधिक कालावधीच्या झाल्या असल्याने, त्या ठिकाणी नवीन पंप हाऊस उभारण्याचे निविदा प्रक्रियेत असलेले काम करताना ते दूरगामी विचार करून अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर करून करण्याचे निर्देश दिले, नवीन पम्प हाऊस बांधण्याचे काम करण्यात या अशीही सूचना आयुक्तांनी केली.