नवी मुंबई शहर हे देशातील एक सुनियोजित शहर आहे. येथे बेलापूर किल्ल्यासह गोवर्धनी माता मंदीर, पावणेश्वर मंदीरापासून सिडकोने विकसित केलेला वाशीचा सी शेअर, बेलापूर येथील नियोजित मरिना, बंद डंम्पिग ग्राऊंडवर कोपरखैरणे येथे फुलविलेले निसर्ग उद्यान, ऐरोलीतील महाराष्ट्र सरकारचे जैवविविधता केंद्र, फ्लेमिंगों सफर आणि देशातील एकमेव फ्लेमिंगो सिटी ही नवी मुंबईची खरी ओळख आहे. गवळीदेव, पांडवकडा धबधबा, चिरनेरचा महागणपती, घारीपूर्वी लेणी यामुळे नवी मुंबई शहर हे एमएमआर क्षेत्रातील टुरिस्ट सिटी म्हणून विकसित होऊ शकते, असा विश्वास नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मंगळवारी व्यक्त केला. तर सिडको ही आता त्या दृष्टीने विचार करणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकिय संचालक डॅाक्टर संजय मुखर्जी म्हणाले.
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई प्रेस क्लबने स्वच्छ पर्यटन, आरोग्यदायी पर्यटन हा संदेश प्रसारासाठी नवी मुंबई ते हंपी-बदामी-चिकमंगलूर- हडेबडी-गोवा अशी रस्तेमार्गे अभ्यास सहल आयोजित केली आहे. तिचा शुभारंभ बांगर व मुखर्जी यांनी श्रीफळ वाढवून केला. यावेळी नवी मुंबईला टुरिस्ट सिटी म्हणून विकसित करण्याचे निवेदनही प्रेस क्लबने उभय मान्यवरांना दिले नवी मुंबई महापालिका, सिडकोसह महाराष्ट्र सरकारने टुरिस्ट सिटी म्हणून विकसित करावे, अशी नवी मुंबई प्रेस क्लबची मागणी आहे.
देशातील अनेक पर्यटनस्थळे दुर्लक्षित झाली आहेत, अशा पर्यटनस्थळांची जगाला ओळख व्हावी व प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या ठिकाणी स्वच्छता राखून नागरिकांना आरोग्यदायी पर्यटन करता यावे ही संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून जागतिक पर्यटन दिनी अर्थात २७ सप्टेंबर रोजी ही सहल निघाली आहे. भारतिय पर्यटकांनी जर देशातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी स्वच्छता राखली तर विदेशातील पर्यटकाची आपल्याकडे रिघ लागेल असे मुखर्जी म्हणाले.
यावेळी महापालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, उपायुक्त बाळासाहेब राजळे, जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे, माजी अतिरिक्त आयुक्त डॅा. संजय पत्तीवार उपस्थित होते.