इजिप्त, मध्य प्रदेशातील कांद्यामुळे दर स्थिर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 01:18 AM2019-12-06T01:18:11+5:302019-12-06T01:18:28+5:30
होलसेल मार्केटमध्ये गुरुवारीही ८० ते १३० रुपये व किरकोळ मार्केटमध्ये १०० ते १५० रुपयांनीच कांदा विकला जात आहे.
नवी मुंबई : मुंबईमधील कांदाटंचाई दूर करण्यासाठी गुजरात, मध्यप्रदेशसह इजिप्तवरूनही नियमित कांद्याची आवक सुरू आहे; परंतु आवश्यकतेपेक्षा ३०० ते ५०० टन आवक कमी होत असून, त्यामुळे मार्केटमधील तेजी कायम आहे. होलसेल मार्केटमध्ये गुरुवारीही ८० ते १३० रुपये व किरकोळ मार्केटमध्ये १०० ते १५० रुपयांनीच कांदा विकला जात आहे.
देशातील अनेक राज्यांना व विदेशातील अनेक देशांनाही महाराष्ट्र वर्षभर कांद्याचा पुरवठा करत असतो; परंतु पावसाने पिकांचे नुकसान झाल्यामुळे राज्यातही कांदाटंचाई निर्माण झाली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये एक महिन्यापासून इजिप्तवरूनही नियमित कांद्याची आवक सुरू आहे. नोव्हेंबरमध्ये हुबळीवरून एक महिना आवक सुरू होती. सद्यस्थितीमध्ये पुणे, संगमनेर, नाशिकमधून मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. याशिवाय गुजरात व मध्यप्रदेशमधूनही कांदा विक्रीसाठी येऊ लागला आहे. मुंबईत चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे गुजरात व इंदोरमधील माल विक्रीसाठी येथे पाठविला जात आहे.
देशभरातून गुरुवारी ९३८ टन कांदा विक्रीसाठी आला होता. सद्यस्थितीमध्ये १२०० ते १५०० टन कांद्याची आवश्यकता असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. जोपर्यंत आवक सुरळीत होत नाही, तोपर्यंत बाजारभाव जैसे थे राहतील, अशी प्रतिक्रियाही काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील बाजारपेठेमधील गुरुवारचे बाजारभाव
बाजार समिती भाव (प्रतिकिलो)
कोल्हापूर २० ते १३०
मुंबई ८० ते १३०
सोलापूर ०२ ते २००
संगमनेर १० ते १५०
पुणे ३० ते १२५
चांदवड १५ ते ९५
बाजार समितीमधील कांद्याचे दर पुढीलप्रमाणे
महिना दर (प्रतिकिलो)
मार्च ०७ ते ०९
एप्रिल ०७ ते ०९
मे ०८ ते १२
जून १२ ते १६
जुलै ११ ते १४
महिना दर (प्रतिकिलो)
आॅगस्ट १७ ते २२
सप्टेंबर ३७ ते ४५
आॅक्टोबर २८ ते ३४
नोव्हेंबर ५० ते ७५
डिसेंबर ८५ ते १२०