नवी मुंबई : इजिप्तवरून आयात केलेल्या कांद्याकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे तो सडू लागला आहे. बाजार समितीमध्ये मंगळवारी जवळपास २५ टन कांदा कचराकुंडीत टाकला असून, तो उचलण्याचा भार बाजार समितीवर पडला आहे. कांद्याचे गगनाला भिडलेले बाजारभाव नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने आयात सुरू केली होती. आॅगस्टमध्ये इजिप्तवरूनही कांदा आयात करण्यात आला. परंतु या कांद्याचा आकार मोठा असल्यामुळे व त्याचा दर्जाही देशातील कांद्याप्रमाणे नसल्यामुळे ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरविली. ग्राहकच नसल्यामुळे हा कांदा सडू लागला आहे. गत आठवड्यात बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा फेकून द्यावा लागला होता. जवळपास २५ टन कांदा लिलावगृहामध्ये सुकत ठेवला होता. हा कांदाही सडून गेला असून मंगळवारी तो कचराकुंडीत टाकावा लागला. खराब झालेल्या मालामुळे व्यापाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कृषी माल खराब झाला असेल तर तो संबंधित व्यापाऱ्याने महापालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडवर घेवून जाणे आवश्यक असते. परंतु व्यापाऱ्यांनी इजिप्तचा सडलेला कांदा मार्केटमध्येच फेकून दिला आहे. हा सर्व कचरा उचलण्याची जबाबदारी बाजारसमिती प्रशासनावर आली आहे. विदेशी कांद्याला ग्राहक नसल्यामुळे यापुढे कांदा आयात करण्याची शक्यता नसल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
इजिप्तचा कांदा कचराकुंडीत
By admin | Published: October 14, 2015 3:06 AM