ख्रिश्चन वास्तूमध्ये ईदची नमाज, एकात्मतेचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 01:36 AM2018-06-17T01:36:07+5:302018-06-17T01:36:07+5:30
शनिवारी ऐन ईदच्या नमाजावेळी पाऊस आल्याने सीवूडमधील मुस्लीम बांधवांपुढे अडचण निर्माण झाली होती. या वेळी ख्रिश्चन धर्मगुरूंनी त्यांना नमाजासाठी वास्तू उपलब्ध करून दिली.
नवी मुंबई : शनिवारी ऐन ईदच्या नमाजावेळी पाऊस आल्याने सीवूडमधील मुस्लीम बांधवांपुढे अडचण निर्माण झाली होती. या वेळी ख्रिश्चन धर्मगुरूंनी त्यांना नमाजासाठी वास्तू उपलब्ध करून दिली. त्यानुसार सर्वधर्म समभावनेचा संदेश देत त्या ठिकाणी ईद साजरी करण्यात आली.
यंदा रमजान महिना पावासाळ्यात आल्याने शनिवारी ईदच्या नमाजावेळी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ठिकठिकाणी उघड्यावर पडल्या जाणाऱ्या नमाजात अडथळा निर्माण झाला होता. असाच प्रसंग सीवूड परिसरातील मुस्लीम बांधवांपुढे निर्माण झाला होता.
नमाजाच्या ठिकाणी पावसाने चिखल झाल्याने नमाज कुठे पढायची, असा त्यांना प्रश्न पडला होता. या वेळी काही मुस्लीम बांधवांनी मातृमिलन सेंटरचे प्रमुख ख्रिश्चन धर्मगुरू फादर सुनील यांची भेट घेतली. त्यांनी वस्तुस्थिती मांडताच फादर सुनील यांनी ख्रिश्चन धर्मीयांच्या
वापरासाठी असलेल्या वास्तूचा तळमजला मुस्लीम बांधवांना ईदची नमाज पठण करण्यासाठी उपलब्ध करून दिला.
त्यानुसार मातृमिलन कम्युनिटी सेंटरमध्ये मोठ्या संख्येने मुस्लीम बांधवांनी उपस्थित राहून नमाज पठण केले. त्यानंतर विभागातील शिवसेना पदाधिकाºयांनी मुस्लीम बांधवांना गुलाब पुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मौलाना साकीब, मातृमिलन कम्युनिटी सेंटरचे फादर सुनील, शिवसेना विभागप्रमुख सुमित्र कडू, उपविभागप्रमुख राजेंद्र मोकला, राजेश घाडगे, परिवहन समिती सदस्य समीर बागवान, प्रकाश राणे, सुरेश माळवे, मुबीन काझी, विद्याधर महाडेश्वर, गणेश कांबळे, जितेंद्र कोंडस्कर, दत्ता साबळे आदी सर्वधर्मीय बांधव उपस्थित होते.