ईदनिमित्त अपूर्व उत्साह

By admin | Published: June 27, 2017 03:15 AM2017-06-27T03:15:15+5:302017-06-27T03:15:15+5:30

रमजान ईद ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. ठाणे, मुंब्रा, कल्याण, भिवंडी, काशिमीरासह

Eidnimit Apollo Joshi | ईदनिमित्त अपूर्व उत्साह

ईदनिमित्त अपूर्व उत्साह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: रमजान ईद ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. ठाणे, मुंब्रा, कल्याण, भिवंडी, काशिमीरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या मशिदींमध्ये ईदनिमित्त खास नमाज अदा करण्यात आली आणि अलिंगनासह परस्परांना शुभेच्छा देत ‘ईद मुबारक’ चा संदेश देत आनंदाची देवाण-घेवाण करण्यात आली. ईदच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पोलिसांनीकडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
ठाण्यात राबोडी, महागिरी कोळीवाडा, इंदिरानगर, हाजुरी परिसरातील मशिदींमध्ये सकाळीच नमाज अदा करून शांतता आणि स्थैर्यासाठी प्रार्थना करत ईदच्या शुभेच्छा दिल्या. नवीन कपडे घालून सजलेल्या बच्चे कंपनीचा उत्साह विलक्षण होता. ईदनिमित्त देण्यासाठी बेटवस्तू, कपडे, दागिने, चपला, सुकामेवा, चॉकलेट, अत्तर यांच्या खरेदीसाठी बाजारपेठांत दिवसभर गर्दी होती. पोलीस आणि अन्य धर्मीयांनी गुलाबाचे फूल आणि मिठाई भेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. तर मुस्लिमांकडून त्यांना शिरकुर्मा देत त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
सोशल मीडियातही रविवारी रात्री चाँद दिसल्यापासूनच ईदच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. ईदनिमित्त गरीबांना होणारे कपडे आणि अन्नधान्य वाटपाचे कार्यक्रम, शैक्षणिक मदत यांचेही उपक्रम ठिकठिकाणी हाती घेण्यात आले होते.
भिवंडीतही जोरदार खरेदी
भिवंडी : महिनाभराच्या रोजानंतर विशेष नमाज अदा करून भिवंडीतही उत्साहात ईद साजरी झाली. ईदच्या खरेदीनिमित्ताने इतकी गर्दी झाली, की जुनी एसटी ते तीनबत्ती नाका रस्ता बंद झाला होता. रात्री पडणाऱ्या रिमझिम पावसाची तमा न बाळगता शहरातील विविध भागात उशिरापर्यंत महिला-पुरूषांनी विविध वस्तु व कपड्यांची खरेदी केली. सोमवारी मात्र पावसामुळे मोठ्या मशिदींत टप्प्याटप्प्यात दोनदा नमाज पठण झाले. अहले हदीस मजलक यांना मानणाऱ्या मशिदींत महिलांना नमाज अदा करण्यासाठी वेगळी व्यवस्था केली होती. कोटरगेट येथील जामा मशिदीत पोलिसांनी गुलाबाची फुले देत शुभेच्छा दिल्या. दिवसभर सर्वत्र ईदचा उत्साह कायम होता.
कल्याण-डोंबिवलीत उत्साह
कल्याण : कल्याण-डोंबिवलीतही ईदच्या शुभेच्छा देण्याचा आनंद लुटण्यात आला. कल्याणचा दूधनाका, दुर्गाडी, रेतीबंदर, बाजारपेठ, नेतिवली आदी भागांत १७ मशिदी आहेत. त्यात विशेष नमाज पठण झाले. सगळयात मोठे नमाजपठण दुर्गाडी येथे झाले. यावेळी समाजाचे कार्यकर्ता शरफुद्दीन कर्पे, नगरसेवक काशीफ कानिकी यांनी शुभेच्छा दिल्या. नमाजपठणानंतर देशबांधवांसाठी प्रार्थना करण्यात आली. डोंबिवलीतील हिना मंझिल येथे ईद उत्साहात साजरी करण्यात आली. खंबाळपाडा येथील भोईरवाडी परिसरात बोहरी मुस्लिमांनी नित्यनमाजपठण करून एकमेकांना शुभेच्छा देत सणाचा आनंद घेतला. अनेक मुस्लिम सामाजिक संघटनांतर्फे गोरगरीब वस्तीत शिरकुर्म्याचे वाटप करण्यात आले.
मुंब्य्रात प्रचंड गर्दी
मुंब्रा : रमजान ईदनिमित्त खरेदीसाठी मुंब्य्रात प्रचंड गर्दी झाली होती. रेल्वे स्थानकासमोरील तसेच कौसा भागातील जामा मशिदीप्रमाणे दारु ल फलाह, फकरु उद्दीनशहा बाबा दर्ग्याजवळील प्रमुख मशिदींसह विविध ठिकाणी ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली. नंतर गळाभेट घेऊन परस्परांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पोलिसांनीही गुलाब पुष्प वाटपाचा कार्यक्रम केला. लहान मुलांना ईदी म्हणून रोख रक्कम देऊन त्याचा आनंद द्विगुणित करण्यात आला. ईदचा चाँद दिसल्यानंतर रविवारी रेल्वे स्थानकाजवळील तसेच गुलाब पार्क मार्केटमध्ये कपडे, पादत्राणे, सौंदर्य प्रसाधने, अत्तरे आदींच्या खरेदीसाठी पहाटेपर्यंत झुंबड उडाली होती.

Web Title: Eidnimit Apollo Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.