पनवेलमध्ये कुत्र्याचा आठ जणांना चावा; भटक्या कुत्र्यांची पुन्हा दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 11:18 PM2020-01-11T23:18:03+5:302020-01-11T23:18:09+5:30
दीड वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश
पनवेल : गेल्या वर्षी ऐन दिवाळीत भटक्या कुत्र्यांनी तीस जणांना चावा घेतल्याची खळबळजनक घटना घडली होती. त्यानंतर पनवेलकरांनी कुत्र्यांची धास्ती घेतली होती. शनिवारी पुन्हा एका भटक्या कुत्र्यांने आठ जणांना चावा घेतल्याची घटना घडली. यात एक दीड वर्षाचा चिमुकला जखमी झाली आहे. पनवेलमधील तक्का गावात ही घटना घडली आहे.
पनवेलमध्ये दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. मागील तीन वर्षांपासून कुत्र्याचे निर्बीजीकरण झाले नसल्याने कुत्र्यांची संख्या पाच हजारांवर गेली आहे. महापालिकेमार्फत कुत्र्याच्या निर्बीजीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र, पिसाळलेल्या कुत्र्यांना आवर घालणे गरजेचे आहे.
तक्कामधील पिसाळलेल्या कुत्र्याने शनिवारी आठ जणांवर हल्ला केला. यात दीड वर्षीय अमरान पटेल या चिमुकल्याच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. या व्यतिरिक्त मुंगळ मुंडा या महिलेच्या हाताला सुध्दा या कुत्र्याने चावा घेतला आहे. त्यानंतर अवघ्या आठ दिवसानंतर पनवेल रेल्वे स्थानकाजवळील मालधक्का परिसरात भटक्या कुत्र्याने सात जणांचा चावा घेतल्याची घटना घडली होती. लागोपाठ घडणाºया या घटनांमुळे पनवेलकरांत दहशतीचे वातावरण पसरले आहे.शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. त्याचा त्रास नागरिकांना विशेषत: लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे. पालिकेकडे याबाबत कोणतीच यंत्रणा नसल्याने हा त्रास वाढत चालला आहे.
पालिका क्षेत्रात सध्याच्या घडीला पाच हजारांपेक्षा जास्त मोकाट कुत्रे आहेत. शनिवारच्या घटनेने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
महापालिकेच्या स्थापणेअगोदर सिडकोच्या माध्यमातून पोदी येथे कुत्र्यांचे निर्बीजीकरण केंद्र चालविले जात होते. त्यासाठी एका एजन्सीची नियुक्ती करण्यात आली होती. या एजन्सीच्या माध्यमातून शहरातील तब्बल दहा हजार मोकाट कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, महापालिकेच्या स्थापनेनंतर सिडकोने ही सेवा हस्तांतरित केली आहे. तेव्हापासून श्वान निर्बीजीकरण यंत्रणा बंद पडली होती. मात्र गेल्या वर्षी दिवाळीत घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने अलिकडेच स्वत:चे श्वान निर्बिजीकरण केंद्र सुरू केल्याचे समजते.
चार महिन्यात ५५ जणांना चावा
पनवेमधील मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. मागील चार महिन्यात शहरात कुत्रे चावल्याच्या तब्बल ५५ घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे यात महिला व लहान मुलांचाही समावेश आहे.