खारघर परिसरात आढळला आठ फूट लांब अजगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 11:27 PM2020-01-14T23:27:37+5:302020-01-14T23:28:02+5:30
सर्पमित्रांनी दिले जीवदान; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नवी मुंबई : खारघर येथील पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावर आठ फूट लांब अजगर आढळला. पुनर्वसू फाउंडेशनच्या सर्पमित्रांनी या अजगराला जंगलात सोडले.
खारघर पेट्रोल पंपाजवळील कॅफे कॉफी डे परिसरातील रस्त्यावर एक मोठा साप असल्याची माहिती खारघर पोलिसांनी पुनर्वसू फाउंडेशनचे सर्पमित्र स्वप्निल साटम यांना दिली. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र साटम व त्याचे सहकारी मित्र अनिकेत गायकवाड घटनास्थळी दाखल झाल्यावर सदर साप हा भारतीय अजगर या जातीचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखत पुनर्वसू फाउंडेशन सर्पमित्रांनी सुमारे नऊ फूट लांब असलेल्या अजगराला खारघर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुखरूपरीत्या ताब्यात घेतले. वन संरक्षक जनार्दन बोडेकर यांच्या उपस्थितीत जंगलात सोडले.