नवीन पनवेलमध्ये आठ तास बत्ती गुल
By admin | Published: February 1, 2016 01:46 AM2016-02-01T01:46:37+5:302016-02-01T01:46:37+5:30
वीज खंडित होण्याची नित्याची समस्या असलेल्या नवीन पनवेल, खांदा वसाहतीत रविवार दुपारपासून वीजपुरवठा खंडित झाला होता
पनवेल : वीज खंडित होण्याची नित्याची समस्या असलेल्या नवीन पनवेल, खांदा वसाहतीत रविवार दुपारपासून वीजपुरवठा खंडित झाला होता. तब्बल आठ तास बत्ती गुल झाल्याने ऐन सुटीच्या दिवशी नागरिकांना अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागले.
नवीन पनवेल परिसरातील असलेल्या डी मार्टजवळ भूमिगत वीज वाहिनीत दुपारी २ च्या सुमारास अचानक बिघाड झाला. हा बिघाड शोधण्यासाठी तब्बल ७ तास लागल्याने खांदा वसाहत, नवीन पनवेलमधील नागरिकांना सुटीचा दिवस अंधारात घालवावा लागला.
डी मार्टजवळ वीजवाहिन्यांचे आपापसात घर्षण होऊन स्पार्र्किंग झाले. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. हा बिघाड शोधण्यासाठी महावितरणला वाशीवरून बिघाड शोधणारी (केबल फॉल्ट डिटेक्टर) मशीन मागवावी लागली, अशी माहिती महावितरणचे अधिकारी डी. बी. गोसावी यांनी दिली. त्यानंतर हा बिघाड शोधण्यात यश आले. बिघाड झालेली विद्युतवाहिनी जास्त क्षमतेची असल्याने ५ ते ६ कर्मचारी याठिकाणी काम करीत होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली. सुटीचा दिवस असल्याने अनेक जण घरीच असल्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागले.