खारघरमध्ये आठ तास शोधकार्य सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 10:56 PM2019-08-03T22:56:02+5:302019-08-03T22:56:12+5:30
रविवारीही शोधमोहीम; अग्निशमन दल, पोलिसांसह स्थानिक नागरिकांची मदत
नवी मुंबई : खारघर धबधबा परिसरामध्ये चार विद्यार्थिनी वाहून गेल्यानंतर तत्काळ शोधकार्य सुरू करण्यात आले. आठ तास सलग शोध घेतल्यानंतरही एका मुलीचा मृतदेह सापडू शकलेला नाही. सायंकाळी सात वाजता मोहीम थांबविली असून रविवारी पहाटे पुन्हा मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले जाणार आहे.
पांडवकडा परिसरात पर्यटक वाहून गेल्याचे वृत्त समजताच खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार व त्यांची टीम तत्काळ घटनास्थळी पोहोचली. दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिमंडळ २ चे उपआयुक्त अशोक दुधे यांनीही घटनास्थळी भेट दिली. अग्निशमन दलाचे जवान व पोलिसांनी तत्काळ धबधबा परिसरात वाहून गेलेल्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. खारघर परिसरातील स्थानिक नागरिकांचीही यासाठी मदत घेण्यात आली. स्थानिक नागरिकांनी प्रवाहामध्ये जाऊन शोध घेण्यास सुरुवात केली. दुर्घटना झालेल्या ठिकाणापासून अर्धा किलोमीटर परिसरात दिवसभरात तीन विद्यार्थिनींचा मृतदेह शोधण्यात यश आले. एक मृतदेह सायंकाळी सात वाजेपर्यंत सापडला नाही. अंधार पडल्यानंतर शोधमोहीम थांबविण्यात आली. या घटनेचे वृत्त समजल्यानंतर विद्यार्थिनींच्या नातेवाईक व परिचितांनीही घटनास्थळी धाव घेतली होती.
मृतदेह सापडल्यानंतर अनेकांना शोक आवरता आला नाही. घटनेची माहिती समजल्यानंतर मदत कार्यासाठी व पाहण्यासाठीही नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. ४०० ते ५०० नागरिक या परिसरात उपस्थित होते. दुर्घटना घडल्यानंतरही पर्यटकांचा ओघ थांबला नव्हता. यापुढे पांडवकडा परिसरात बंदी आदेश झुगारून कोणी आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
घडलेली घटना दु:खद आहे. चारही विद्यार्थिनी एस.वाय.बी.कॉम.च्या वर्गात शिक्षण घेत होत्या. अभ्यासामध्येही सर्व हुशार होत्या. यापैकी कोणीही शनिवारी महाविद्यालयामध्ये उपस्थित नव्हत्या.
- डॉ. मिलिंद वैद्य, प्राचार्य,
एसआयईएस महाविद्यालय, नेरूळ
सकाळी साडेसात वाजता मुलगी नेहा दामा महाविद्यालयात जाण्यासाठी घरातून गेली होती. आम्हाला मुलगी खारघर धबधब्यामध्ये वाहून गेली असल्याचा फोन आल्यानंतर आम्ही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सकाळी साडेसात वाजता मुलीशी शेवटचा संपर्क झाला होता.
- गीता दामा, पालक
खारघरमधील पांडवकड्याच्या बाजूला गोल्फ कोर्सजवळील धबधबा परिसरात काही मुले ९ वाजण्याच्या सुमारास आली होती. सातपैकी दोघांना वाचविण्यात आले आहे. वाहून गेलेल्या चारपैकी तिघींचे मृतदेह सापडले आहेत. धबधबा परिसरात पर्यटकांना बंदी घातली असून बंदोबस्तही ठेवला आहे. बंदी झुगारून येथे येणाऱ्यांवर गुन्हेही दाखल केले जात आहेत.
- अशोक दुधे, उपआयुक्त परिमंडळ २
एसआयईएस महाविद्यालयामधील सात विद्यार्थी या ठिकाणी फिरण्यासाठी आले होते. त्यामध्ये माझा भाऊही होता. वडिलांना फोन आल्यानंतर आम्ही तत्काळ या ठिकाणी आलो. पावसाचा प्रवाह वाढल्यामुळे मुली घसरल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे आम्हाला समजले.
- अमीर, विद्यार्थ्याचे नातेवाईक