उरण : बेशिस्त ट्रेलरचालक आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे जेएनपीटी मार्गावरील करळ-बेलापूर दरम्यान आणि कळंबोली-जेएनपीटी या रस्त्यावरील वाहतूक शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासूनच ठप्प झाली होती. सुमारे आठ तास ट्रॅफिक जाम झाल्याने रस्त्यावर १२ कि.मी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतुकीची समस्या उद्भवल्याने सकाळीच निघालेल्या शालेय विद्यार्थी, कामगार, प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
जेएनपीटी-बेलापूर आणि जेएनपीटी-कळंबोली दरम्यानच्या रस्त्यांवर वाहतूककोंडीची समस्या ही नित्याचीच बाब ठरली आहे. या दोन्ही मार्गावर वाहतूक नियम मोडीत काढीत शेकडो कंटेनर दुतर्फा रस्त्यावर बेकायदेशीरपणे पार्र्किं ग करून ठेवले जातात. दुतर्फा पार्र्किं गमुळे मात्र वाहतूककोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे. त्यामध्ये बेशिस्त कंटेनरचालकांची भर पडत असल्याने या दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असते. गुरुवारी संध्याकाळपासून जांभूळपाडा मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली, तसेच मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी अनेक वाहने बंद पडलेली होती. त्यामुळे या दोन्ही मार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी वाढली. याआधीच या दोन्ही मार्गावर वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामध्ये जांभूळपाडा मार्गावर वाहतूक बंद केल्याने या दोन्ही मार्गावरील वाढलेल्या प्रचंड वाहतुकीच्या गर्दीमुळे शुक्रवारी जेएनपीटी मार्गावरील करळ-बेलापूर दरम्यान आणि कळंबोली-जेएनपीटी या रस्त्यावरील वाहतूक सकाळी ७ वाजल्यापासूनच ठप्प झाली होती.
वाहतूककोंडीमुळे दोन्ही मार्गावर सुमारे १२ कि.मी. अंतरापर्यंत वाहनांच्या रांगाच लागल्या होत्या. या वाहतूककोंडीचा मोठा फटका दररोज उरणहून मुंबई-वाशी-पनवेलकडे जाणाºया हजारो शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार, प्रवासी आणि वाहनचालकांना बसला. अनेकांना वाहतूककोंडीमुळे वेळेत इच्छित स्थळी पोहोचता आले नाही. तर अनेकांवर वाहनांमध्येच अडकून बसण्याची पाळी आली.
गुरुवारी संध्याकाळपासून जांभूळपाडा मार्गावरील वाहतूक अचानक बंद करण्यात आली, त्यामुळे या मार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी वाढली. मात्र, वाहतूक नियंत्रण विभागाचे कर्मचारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र, वाहतुकीची कोंडी सोडविण्यात अपयश आल्याने वाहतूककोंडीची समस्या आणखी गंभीर बनली होती. १२ वाजल्यानंतर वाहतुकीची कोंडी सुरुवात झाल्यानंतर वाहने पुढे सरकू लागली आणि दुपारी ३ वाजल्यापासून रहदारी संथगतीने सुरू झाली. जासई-गव्हाणफाटा-बेलापूर दरम्यानची वाहतूक वगळता उर्वरित मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी दिली.