परिमंडळ १ ला लाभले अकरावे आयपीएस अधिकारी
By admin | Published: January 7, 2016 12:59 AM2016-01-07T00:59:24+5:302016-01-07T00:59:24+5:30
परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांना आयपीएस केडर मिळाला आहे. या तीन दशकांमध्ये नवी मुंबईमध्ये काम करणारे व भारतीय पोलीस सेवेत गेलेले ते अकरावे
नामदेव मोरे, नवी मुंबई
परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांना आयपीएस केडर मिळाला आहे. या तीन दशकांमध्ये नवी मुंबईमध्ये काम करणारे व भारतीय पोलीस सेवेत गेलेले ते अकरावे अधिकारी आहेत. पहिले उपायुक्त के. पी. रघुवंशी, हेमंत करकरे यांच्यासह अनेक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी या परिसरात कामाची स्वतंत्र छाप पाडली आहे.
नवी मुंबई परिमंडळ एकचे २१ वे उपायुक्त म्हणून शहाजी उमाप यांनी आॅगस्ट २०१४ ला कार्यभार स्वीकारला. चेहऱ्यावरून मवाळ वाटणाऱ्या या अधिकाऱ्याने पदभार स्वीकारताच शहरात एकही अवैध व्यवसाय खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. अवैध व्यवसायांवर धाडसत्र सुरू केले. नवीन अधिकारी आला की बार, जुगार व इतर ठिकाणी धाडी टाकणे हे नित्याचेच असल्यामुळे कोणी फारसे गांभीर्याने घेतले नाही. परंतु उमाप यांनी कारवाईसाठी विशेष पथक तयार केले. सर्व जुगार अड्डे बंद केले. मटका, आॅइल चोरी, लेडीज बार, उघड्यावर सुरू असलेले मद्यपान, व्हिडीओ पार्लर, गणेशोत्सवातील जुगार सर्वांवर कारवाईचा धडाका सुरू केला. तुर्भे, बेलापूर व इतर अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे सुरू असलेले जुगार अड्डे पहिल्यांदाच पूर्णपणे बंद झाले. त्यांच्या या कामगिरीचे शहरात सर्वत्र कौतुक झाले. अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा उलगडा त्यांनी सहजपणे केले. करावे परिसरातील महिलेच्या खुनाचा तपास करण्यासाठी राज्यातील सर्व मतदार याद्या तपासल्या व त्या महिलेचा पत्ता व आरोपी दोन्ही शोधून काढले होते. महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असलेल्या उमाप यांना भारतीय पोलीस सेवेत बढती मिळाली आहे. नवी मुंबईमध्ये काम केलेले व आयपीएस झालेले ते अकरावे अधिकारी ठरले आहेत.
नवी मुंबई हा पूर्वी ठाणे पोलीस आयुक्तालयाचा भाग होता. १ नोव्हेंबर १९८५ मध्ये के. पी. रघुवंशी हे पहिले उपायुक्त झाले. पुढे एटीएस प्रमुख म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. त्यांच्यानंतर आलेले पी. पी. श्रीवास्तव ही आयपीएस झाले. मोहल्ला कमिटीची संकल्पना यशस्वीपणे राबविणाऱ्या सुरेश खोपडे यांनीही नवी मुंबईत काही काळ काम केले आहे. २६ नोव्हेंबरला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे हेही नवी मुंबईमध्ये कार्यरत होते. यानंतर विजय कांबळे, बी. एस. शिंदे, आर. डी. शिंदे, प्रताप दिघावकर व आता शहाजी उमाप यांना आयपीएस केडर मिळाला असून पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.