लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : उलवे येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत अमली पदार्थ बाळगणारे नायजेरियन आढळून आले होते. याप्रकरणी आठ घरमालकांवर एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विदेशी नागरिक भाडोत्री ठेवताना त्यांनी पोलिसांना त्याची कल्पना दिली नव्हती. पुष्पा राठोड, किरण राठोड, चैथूबाई कोळी, बाळू गजगे, अशोक जानकर, आशिष धीर, अपर्णा गोंधळी व समीर दाऊद खान देशमुख, अशी त्यांची नावे आहेत.
ड्रग्ज विक्रीशी संबंधित असणाऱ्या विदेशी नागरिकांविरोधात नवी मुंबई पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. उलवे परिसरात राहणाऱ्या नायजेरियन व्यक्तींची ६ ऑक्टोबरला धरपकड करण्यात आली होती.
या कारवाईत १४ नायजेरियन बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याचे आढळून आले होते, तर एकाकडे ८४ लाखांचे अमली पदार्थ आढळून आले होते. या कारवाईनंतर पोलिसांनी त्यांना आश्रय देणाऱ्या घरमालकांची चौकशी सुरू केली होती. त्यामध्ये या नायजेरियन व्यक्तींना भाड्याने ठेवताना पोलिसांना कळवले नव्हते, अशी माहिती समोर आली.
विदेशी नागरिकांकडून अधिक प्रमाणात भाडे मिळत असल्याने अनेक जण पोलिसांना कल्पना न देता, भाडेकरार न करता, नायजेरियन व्यक्तींना आश्रय देतात. याचा फायदा घेऊन ते गुन्हेगारी कृत्ये करत असतात. उलवे परिसरातही १२ ठिकाणी हे नायजेरियन राहत असताना, संबंधित घरमालकांनी पोलिसांना त्याची कल्पना दिली नव्हती.