नागोठणे : पाचशे आणि १००० च्या नोटा रद्द केल्याची घोषणा ८ नोव्हेंबरला करण्यात आली होती. १० नोव्हेंबरपासून नव्याने चलनात आणलेल्या ५०० आणि २००० च्या नोटा ग्राहकांना देण्यात येतील व रद्द करण्यात आलेल्या काही विशिष्ट रकमेच्या नोटा बँकेत बदली करून मिळतील, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे मागील गुरुवारपासून येथील स्टेट बँक, बँक आॅफ इंडिया, देना बँक, बँक आॅफ हैदराबाद या शाखांमध्ये ग्राहकांच्या रांगा लागत आहेत.येथील एटीएमसुद्धा काही अंशी बंदच राहात असल्याने ग्राहकांना पैसे मिळण्यासाठी द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे. येथील बँकांमध्ये ५००च्या नवीन नोटा आलेल्याच नसल्यामुळे खात्यातून पैसे काढताना किंवा जुन्या नोटा बदली करताना दोन हजारांची नोट ग्राहकांच्या माथी मारली जात असली, तरी बाजारपेठेत सुटे पैसे देण्याचे कारण सांगून या नोटेतून १०० - २०० रुपयांची खरेदी करता येत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करतात. सुटे पैसे उपलब्धच होत नसल्यामुळे नोटबंदीचा फटका शहरातील बहुतांशी व्यावसायिकांना बसला असून छोटे व्यावसायिकांचा रोजचा धंदा ५० ते ६० टक्क्यांनी खालावला असल्याचे सांगतात. सुटे पैसे नसल्याचे कारण पुढे करून पेट्रोल पंपचालक ५०० किंवा १००० रुपयांचे पेट्रोल, डिझेल भरण्याची सक्तीच करीत असल्याने वाहनचालकसुद्धा या नोटबंदीत भरडून गेल्याचे चित्र त्यानिमित्ताने दिसून येत आहे.
आठव्या दिवशीसुद्धा बँकांसमोर रांगा...
By admin | Published: November 18, 2016 3:39 AM