विधानसभेसाठी बेलापूर ऐरोलीवर शिंदेसेनेचा दावा; नाईक, मंदा म्हात्रेंची डोकेदुखी वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 10:07 AM2024-07-04T10:07:32+5:302024-07-04T10:08:03+5:30
महायुती सरकारने दोन वर्षांत केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी सानपाडा येथील वडार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नवी मुंबई : एसआरएला काही व्यक्तींनी विरोध केल्यामुळे झोपडपट्टीचे सर्वेक्षण थांबले आहे; पण आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून सर्वेक्षण व एसआरएचा प्रश्न मार्गी लावणार आहोत.
निवडणुकीमध्ये नवी मुंबईमधील ऐरोली आणि बेलापूर दोन्ही विधानसभा मतदारसंघांची मागणी आमचा पक्ष करेल, असा निर्धार शिंदेसेनेचे जिल्हा अध्यक्ष विजय चौगुले यांनी व्यक्त केला. चौगुलेंच्या या मागणीमुळे महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपच्या गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे या विद्यमान आमदारांची डोकेदुखी वाढली आहे. महायुती सरकारने दोन वर्षांत केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी सानपाडा येथील वडार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनेते विजय नाहटा यांनी शासन राज्यभर राबविणार असलेल्या योजनांची माहिती दिली.
झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी सर्वेक्षण सुरू केले होते. परंतु, काही व्यक्तींनी विरोध केल्यामुळे सर्वेक्षण थांबले आहे. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार आहोत. ज्यांच्या जमिनीवर झोपड्या उभारल्या आहेत, त्याच प्राधिकरणाच्या माध्यमातून एसआरए योजना राबविण्याचेही प्रस्तावित आहे. याविषयीचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
‘लाव रे तो व्हिडीओची वेळ’ आमच्यावर कोणी येऊ देऊ नये, असा इशाराही त्यांनी राजकीय विरोधकांना दिला. यावेळी दिलीप घोडेकर, विजय माने, विलास भोईर, रामआशिष यादव, दमयंती आचरे, सरोज पाटील, शीतल कचरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.