मराठा समाजासह माथाडी कामगारांना न्याय देणार- एकनाथ शिंदे
By नामदेव मोरे | Published: September 25, 2022 01:39 PM2022-09-25T13:39:06+5:302022-09-25T13:40:17+5:30
राज्यातील सरकार सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी कामगारांचे आहे. सरकार सर्वांची जबाबदारी घेणारे सरकार आहे.
नवी मुंबई:
राज्यातील सरकार सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी कामगारांचे आहे. सरकार सर्वांची जबाबदारी घेणारे सरकार आहे. मराठा समाजासह माथाडी कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त नवी मुंबईत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. माथाडी कामगारांच्या घराचे प्रश्न सोडविले जातील. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई केली जाईल. मराठा समाजाचे प्रश्न सोडविले जातील. हे सरकार जबाबदारी घेणारे, निर्णय घेणारे सरकार आहे.कामाचा धडाका पाहून काहींना धडकी भरली आहे.राज्यात 75 हजार नोकरभरती केली जाणार असल्याचेही सांगितले. कामगार मंत्री सुरेश खाडे यांनीही कामगारांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
वसुली सम्राटांना जेलमध्ये टाकणार- देवेंद्र फडणवीस
माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. माथाडींच्या नावाखाली काही जण वसुलीचे काम करत आहेत. अशा वसुली सम्राटांना जेलमध्ये टाकणार असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
अशोक चव्हाण व मागील सरकारमुळेच मराठा आरक्षण गेले- नरेंद्र पाटील यांचा आरोप
मागील सरकारच्या काळात अडीच वर्षात मराठा समाजावर अन्याय झाला. अशोक चव्हाण यांनी आरक्षण घालविले. चव्हाण यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी दिली असती तर परिस्थिती वेगळी दिसली असती.अण्णासाहेब पाटील महामंडळाचे प्रश्न ही सुटले नाहीत असे मतही पाटील यांनी व्यक्त केले.
नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब पाटील महामंडळ देणार
माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी यापूर्वी अण्णासाहेब पाटील महामंडळाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. पन्नास हजार मराठा उद्योजक घडविले. त्यांच्याकडे पुन्हा महामंडळाची धुरा दिली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
देशद्रोही कृत्य खपवून घेतलेजाणारनाही- मुख्यमंत्री
पुणे येथे पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा दिल्याच्या घटनेविषयी एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाई चे संकेत दिले. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भुमी आहे. येथे देशद्रोही कृत्य खपवून घेतले जाणार नाहीत.संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नवी मुंबई येथे माथाडी मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केले.