अरुणकुमार मेहत्रे, कळंबोलीपनवेल महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेकडून घेण्यात आला असून, ही जबाबदारी संपर्कप्रमुख आदेश बांदेकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. उभयतांनी शुक्रवारी पनवेलमध्ये येऊन पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला. ठाणे, कल्याण, नवी मुंबईतील सर्व नगरसेवक, आमदार आणि खासदार पनवेलमधील निवडणुकीकरिता प्रचारात उतरवणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी या वेळी जाहीरपणे सांगितले. यासाठी ठाणे येथून एक टीम सर्वेक्षण करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पनवेल महानगरापालिकेच्या निवडणुकांची तारीख कधीही जाहीर होऊ शकते. त्यानुसार सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राजकीय पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेकडून १६०पेक्षा जास्त इच्छुकांचे अर्ज आले असून त्यांच्यातून उमेदवार निवडले जाणार असल्याने तशी चाचपणी सुरू झाली आहे. भाजपा किंवा शेकापबरोबर युती न करता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. त्यानंतरही युतीकरिता केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या माध्यमातून चर्चा सुरू आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जे झाले ते महापालिका निवडणुकीत होऊ नये, याकरिता थेट शिवसेना भवनातून व्यूहरचना आखण्यात आली आहे. या ठिकाणी चांगले यश मिळावे, या उद्देशाने एकनाथ शिंदे यांच्यावर पक्षनेतृत्वाने जबाबदारी दिली आहे. ठाणे महापालिकेत सत्ता आणून मुंबईतील अपक्षाची मोट बांधणारे शिंदे यांच्याकडे संघटन कौशल्य आहे. त्याचा वापर पनवेल महापालिकेत करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
सेनेच्या प्रचाराची धुरा एकनाथ शिंदेंवर
By admin | Published: April 17, 2017 4:25 AM