तुर्भेत चोरट्यांकडून वृद्धेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 04:07 AM2018-05-25T04:07:24+5:302018-05-25T04:07:24+5:30
दागिन्यांसह मोबाइल पळविला : नवी मुंबईतही ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
नवी मुंबई : तुर्भेमध्ये सुमन बबन हांडे या ७० वर्षांच्या महिलेचा चोरट्यांनी खून केल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी घरातील तीन लाख सात हजार रुपये किमतीचे दागिने व मोबाइल पळवून नेला आहे. या घटनेमुळे नवी मुंबईत खळबळ उडाली असून, एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मयत सुमन बबन हांडे या तुर्भे सेक्टर २२मधील जमुना निवास इमारतीमध्ये रूम नंबर २मध्ये एकट्याच राहत होत्या. मुलगा प्रवीण हांडेचा वाहतुकीचा व्यवसाय असून, तो भाइंदर येथे वास्तव्य करत असून, मुलगी कोल्हापूर येथे वास्तव्य करत आहे. सुमन या मुलांकडे येऊन-जाऊन असायच्या. १७ ते १९ मे दरम्यान त्यांचा घरामध्येच मृत्यू झाला. घरातून वास येऊ लागल्यामुळे शेजाºयांनी पोलिसांना या विषयी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहिले असता, दरवाजाला आतून कडी लावलेली होती. दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता, वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असल्याचे निदर्शनास आहे. तत्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला व नातेवाइकांना याविषयी माहिती देण्यात आली. शवविच्छेदनादरम्यान मृतदेहावर कोणत्याही जखमा आढळून आल्या नाहीत. नातेवाइकांनाही काहीही संशय आला नसल्यामुळे त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधी केला. हृदयविकारामुळे महिलेचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत होता.
अंत्यविधी झाल्यानंतर महिलेचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचे नातेवाइकांच्या निदर्शनास आले. घरामधील एक लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, एक लाख रुपये किमतीच्या दोन सोनसाखळी, ६० हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या पाटल्या, ४० हजार रुपये किमतीच्या दोन अंगठ्या व सात हजार रुपये किमतीचा मोबाइल गायब असल्याचे निदर्शनास आले आहे. जवळपास तीन लाख सात हजार रुपये किमतीचा ऐवज गायब झाल्यामुळे चोरट्यांनी महिलेचा खून केल्याची तक्रार नातेवाइकांनी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. पोलिसांनीही खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.
तुर्भेमधील एक घरातून वास येत असल्याचे शेजाºयांनी सांगितल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, मृतदेह आढळून आला. मृतदेहावर जखमांचे व्रण नव्हते. शवविच्छेदन अहवालानंतरच खरे कारण स्पष्ट होईल. घरातील दागिने व मोबाइल चोरीला गेला असल्यामुळे चोरट्यांनी खून केल्याचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.
- राजेंद्र गलांडे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एपीएमसी